शृजा प्रभुदेसाई
रूढार्थानं न शिकलेली, जुन्या काळातली स्त्री ‘बयो’. पण प्रत्येक पावलावर ती काळाच्या किती तरी पुढचा विचार करते. पतीच्या समाजसेवेच्या ध्यासात कुटुंबाची होणारी आबाळ सहन न होऊन त्रागा करणारी, मुलांच्या सुखासाठी नवऱ्याच्या विरुद्ध जायला मागेपुढे न पाहणारी. तरीही नवऱ्याचं थोरपण पूर्ण ज्ञात असलेली, वेळ आल्यावर त्याचा आधार होणारी बयो ‘हिमालयाची सावली’ हे नाव सार्थ करणारी! स्त्रीचा हा काळाच्या पुढचा खंबीरपणाच अगदी आजच्या प्रेक्षकालाही आपला वाटला.

प्रा. वसंत कानेटकर यांनी ‘हिमालयाची सावली’ हे नाटक समाजसुधारक धोंडो केशव कर्वे आणि त्यांच्या पत्नी बाया कर्वे यांना डोळ्यांसमोर ठेवून, त्यांच्याच आयुष्यावर लिहिलं आहे. या उभयतांचं जीवनकार्य, समज, द्रष्टेपणा, त्याग, कष्ट, एकनिष्ठा आणि अध्यात्म, जेवढं मोठं आहे, तितकं हे नाटक मोठं आहे. त्याचा आवाका फार विस्तृत, खोल आहे. या लेखात मात्र मी या नाटकातली ‘बयो’ कशी आताच्या काळातली, कालातीत आहे, एवढंच मांडण्याचा प्रयत्न करतेय. तोही अपूर्ण राहण्याची शक्यता अधिक आहे! कारण हे नाटक मला जितकं भिडलंय,आत खोल पोहोचलंय, ते शब्दांत मावणं कठीण आहे!

मुळात निसर्गानंच स्त्रीला निर्माण करताना ती ‘कालातीत’ राहील अशी योजना केली असावी! नकळत्या वयात येणाऱ्या काहीशा कठीण बदलांना आत्मसात करून की काय, न जाणे, पण निर्माण होणारी परिपक्वता, येणारं भान, हळवेपण, माया, पोच, शारीरिक- भावनिक क्षमता, उरक, काळजी घेण्याची अफाट ताकद हे तिच्या घरातल्या वर्तमानालाच नाही, तर पुढच्या पिढ्यांनाही सुखी करून जातात. म्हणून ‘ती’ कालातीत! गंमत अशी, की हे सगळे गुण त्या-त्या गरजेच्या वेळीच सगुण रूप घेतात. पण ते चैतन्य निर्गुण आहे! या नाटकात बयोच्या रूपात हेच दिसतं, भावतं.

आणखी वाचा-‘भय’ भूती : वारसा हक्काने मिळालेली भीती

बयो रंगभूमीवर येण्याअगोदर कानेटकर तिच्याबद्दल लिहितात- ‘… परिस्थितीने खूप पोळलेली, म्हणून खूप शिकलेली. स्त्रीसुलभ भीती आणि लज्जा जळून गेलेली.’ तिला आलेलं शहाणपण हे तिला मिळालेल्या किंवा न मिळालेल्या पुस्तकी शिक्षणावर अवलंबून नाही. पुस्तकी शिक्षण स्त्रीला कधी नाकारलं गेलं, कधी घेता आलं नाही, पण शहाणपण तिच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.ते उपजत आणि म्हणून निरंतर आहे.

या नाटकातले नानासाहेब हे समाजसुधारक आहेत, ध्येयवेडे आहेत. त्यांनी अनेक अनाथ अबलाश्रम, महिला शिक्षण मंदिरं उभारली. विधवा विवाह घडवले, विधवांच्या शिक्षणावर भर दिला. त्यांचा समाजाच्या भल्याचा ध्यास एवढा मोठा आहे, की त्यासाठी ते कितीही कठोर निर्णय घेऊ शकतात. वैयक्तिक तोटा हा त्यांना तोटा वाटत नाही आणि सामाजिक नफा हा वैयक्तिक नफा वाटतो. अशा धीरगंभीर, काहीशा स्थितप्रज्ञ माणसाचा संसार बयो मोठ्या हुशारीनं करतेय. स्वत: कष्ट करून एक-एक पैसा जोडून करतेय.

विसाव्या वर्षापर्यंतच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी नानासाहेबांवर राहील हे त्यांचं ठरलंय. मुलगा पुरुषोत्तम पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होतो आणि त्याला पुढे विलायतेला जाऊन शिकण्याची इच्छा आहे. नानासाहेबांचा त्याला विरोध नसला, तरी त्यासाठी आर्थिक तरतूद करणं ते स्पष्टपणे नाकारतात. त्यांचा ‘समाजप्रपंच’ हा त्यांच्या स्वत:च्या मिळकतीवर चालू आहे आणि मुलाच्या शिक्षणासाठी जास्तीचा खर्च करणं म्हणजे आश्रमाचं- पर्यायानं समाजाचं होणारं नुकसान त्यांना परवडणारं नाही. याची बयोला चांगलीच कल्पना असल्यानं मुलाच्या शिक्षणासाठी तिची पैशांची जुळवाजुळव आधीपासून सुरू आहे. ती सरदार इंदुलकरांच्या वाड्यावर जाऊन तीन हजार रुपयांच्या कर्जाची बोलणीसुद्धा करून आली आहे. त्यासाठी नानासाहेबांनी तिच्या नावे काढलेला विमा ती तारण ठेवणार आहे. इकडे नानासाहेबांनी त्याच विम्याची रक्कम आश्रमासाठी द्यायचा शब्द दिलाय. एकाच रकमेतून दोघांचे परस्परविरोधी, स्वतंत्र मनसुबे आणि दोघंही आपापल्या मुद्द्यावर ठाम! विमा बयोच्या नावावर असल्यानं त्यावर खरंतर तिचा हक्क आहे. पण नानासाहेब माघार घ्यायला तयार नाहीत, कारण प्रश्न आश्रमाचा आहे. बयो प्रथम हक्काची आठवण करून देते, मग गळ घालून बघते… मग नानासाहेबांच्या हट्टाबद्दल आश्रमातल्या माणसांकडे तक्रार करून बघते. कशानेही नानासाहेब बधत नाहीत, म्हटल्यावर ती अगतिकतेनं ‘तीच रक्कम कर्जाऊ द्या,’ म्हणून विनंती करून बघते. त्यावर नानासाहेब विश्वस्त मंडळींची एक तातडीची बैठक बोलवतात आणि ‘नानासाहेबांनी वैयक्तिक मोहापायी शब्द फिरवला,’ अशी बातमी ठळक मथळ्यात छापण्यास पाठवा, अशी सूचना देतात. आता मात्र बयोच्या प्रयत्नांना हार मानण्याची वेळ आली आहे. चिडून, आकांत, आक्रोश करून ती माघार घेते, पण त्याच वेळी नानासाहेबांना डोळ्यांत डोळे घालून सांगते, की ‘‘बयो या ऐवजाची आशा धरून नव्हतीच मुळी! आणि एक, पुरुषोत्तम विलायतेला जाणारच.’’

इथे ही माघारच बयोची ताकद आहे. माघार घेणं शहाणपणाचं असताना ती माघार घेते. वेळ ओळखून मार्ग बदलणं हे बयोचं भान म्हणजे स्त्रीचा कालातीत गुण आहे. बयो पुरुषोत्तमचं शिक्षण विलायतेला करणार, हा विश्वास प्रेक्षकांना आणि कदाचित नानासाहेबांनाही आहे. म्हणूनच ते आश्रमाकडे इतकं लक्ष देऊ शकतात. ‘ती’चा हा गुण ना त्या काळात बदलला, ना कोणत्याही काळात बदलेल. अशा अनेक ‘बयों’नी प्रत्येक काळात, आपल्या संसाराला ईप्सित स्थळी मोठ्या मायेनं, पराक्रमानं पोहोचवलं.

आणखी वाचा-सांधा बदलताना : नव्यातले जुने…

पुरुषोत्तम विलायतेहून शिक्षण पूर्ण करून परत येतो. आता सुबत्ता आली आहे. बयोच्या डोक्यात आता लेकीच्या- कृष्णाच्या लग्नाचं घाटतंय. त्यांच्याच आश्रमात नानासाहेबांनी सांभाळलेला केशव आहे, जो आश्रमाचं काम पाहतोय. कृष्णेला हे स्थळ साजेसं आणि मान्य आहे. बयोनं हे केशवकडे स्पष्ट केलंय, कबुलीही झालीय. परंतु नानासाहेबांना आश्रमासाठी केशवसारख्या मेहनती, उमद्या, संस्कारी, पणअविवाहित तरुणाची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याला जावई करून घेण्यास त्यांचा साफ नकार आहे. यामुळे लेकीचं भावनिक, सांसारिक नुकसान होऊ शकेल, याची त्यांना जाणीव आहे, तरीही ते केशवची समजूत घालतात. त्याच्यासमोर अगतिकतेनं विनवणी करतात. अखेर त्याच्यावर दबाव आणण्याकरिता त्यानं कृष्णेशी लग्न केल्यास काऊन्सिलवर एका वेळी दोन नातेवाईक राहू शकत नाहीत, त्यामुळे केशवला राजीनामा द्यावा लागेल, अशी सूचना करतात. पण आता काय करायला हवं, हे बयोला माहिती आहे. पदर खोचून ती पुढच्या आठ दिवसांतला मुहूर्त बघून आणि नसेल मुहूर्त, तर काळाच्या पुढे जात आळंदीला जाऊन कृष्णा-केशवचं लग्न लावण्याचा निर्णय घेते. नानासाहेबांच्या नाराजीला सामोरं जाण्याची तिची तयारी झाली आहे. काळाच्या खूप पुढचा निर्णय तिनं खमकेपणानं घेतलाय.

बयोची सून बयोच्या नानासाहेबांवर चिडचिड करण्याबद्दल नाराजी व्यक्त करते. तिला आठवण करून देते, की ‘तुम्ही हे विसरताय, की नानासाहेब एक हिमालय आहेत.’ यावर बयो एवढंच म्हणते, ‘‘बये, तू भाग्याची, की या देवमाणसाची तू सून झालीस. आणि एक सांगते, तुझं भाग्य थोर, की तू त्यांची बायको झाली नाहीस!’’ ध्येयवेड्या समाजसुधारकांच्या कुटुंबांचा- विशेषत: त्यांच्या पत्नीचा संघर्ष हा त्या-त्या वेळचा कठीण काळ बदलवण्यासाठी असतो. बयोचा हा दृष्टिकोन आजच्या काळातलाच नाही का!

तिसऱ्या अन् शेवटच्या अंकात नानासाहेब व बयोंवर वज्राघात होतो. आश्रमानं विश्वस्त मंडळाच्या बैठकीत नानासाहेबांना वरवर पाहता अध्यक्ष केलं आहे, पण खरंतर त्यांचा आश्रमातला हस्तक्षेप थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, हे तिला कळतं. केशवला संस्थेत ठेवण्यासाठी, ज्यांनी मुळात आश्रमाची स्थापना केली, जवळचं होतं-नव्हतं आश्रमाला दिलं, मुलाबाळांच्या, कुटुंबाच्या होणाऱ्या आबाळीकडेही त्यासाठी दुर्लक्ष केलं, त्या नानासाहेबांनाच आश्रमानं बाजूला करणं तिला कदापि मान्य नाही. नानासाहेबांच्या निष्ठेचा, ध्येयाचा अपमान तिला सहन होत नाही. ती तिच्या नवऱ्याच्या कर्तृत्वाची चोख जाणीव विश्वस्तांना करून देते. आश्रमात शिरकाव केलेल्या या राजकारणाला, लबाडीला आरसा दाखवते. ‘केशव मिठालाही नाही जागला,’ हे ऐकवून ती सगळ्यांचं पितळ उघडं पाडते. इथे नानासाहेबांभोवती बयोचं कणखर कवच आहे. या स्वार्थी जगात ती त्यांची साथ कधीही सोडत नाही. समोरच्यावर पलटवार करून नानासाहेबांच्या सत्त्वाचं रक्षण करते. नानासाहेबांना जेव्हा अर्धांगवायूचा झटका येतो आणि त्यांची तब्येत खालावते, तेव्हा ती बयोची सेवा आणि साथ, या जोरावरच सुधारते.

आणखी वाचा-संशोधकाची नव्वदी!

बयो आता पुरुषोत्तमकडे विसावली आहे. दिमतीला चार नोकर आहेत. तिला आता यातायात नको वाटतेय. पण नानासाहेबांनी कर्मयोगी मठाच्या उभारणीचा ध्यास घेतलाय. पुन्हा कष्ट नको वाटत असतानाही केवळ नानासाहेबांचं मन रमेल म्हणून बयो मनाचा हिय्या करून ‘हो’ म्हणते. मग तिला अशी कल्पना सुचते, की पुरूषोत्तमच्या या मोठ्या बंगल्यातच मागच्या दोन खोल्यांत नानासाहेबांनी मठ सुरू केला तर?… ती खासगीत पुरुषोत्तमला हे बोलून दाखवते. लहानपणी मठावरून त्यांना किती त्रास झाला, कसा छळ झाला, हे सांगून पुरुषोत्तम त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतो. त्याला ती कटकट वाटते. त्याची नाराजी बयोला कळतेय, पण तरी ती त्याची समजूत घालते. म्हणते, की ‘‘त्यांनीही जन्मभर हालच काढलेत रे! कष्टच उपसलेत.’’ आपल्या माणसाबद्दलची तिची ही जाण निराळी, अलौकिक आहे.

पुरूषोत्तम म्हणतो, ‘‘ते आश्रमासाठी. बायको-मुलांसाठी नानांनी काहीसुद्धा केलेलं नाही.’’

यावर बयोचं उत्तर आहे, ‘‘अरे माझ्या राजा, कावळा-चिमणीचे संसार तर प्रत्येक घरट्यात होतात. स्वत:च्या बायको-मुलांसाठी कोणता पुरूष काबाडकष्ट करत नाही? त्यापेक्षा तुझा बाप एका फार मोठ्या कार्यासाठी जन्मभर आपलं रक्त आटवीत होता, असं नाही का तुला वाटत?’’

एका क्षणी ती हळवी होऊन पुरुषोत्तमवर हातही उचलते. पण सावरते. पुरूषोत्तमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेते. सरते शेवटी, नानासाहेबांनी पुरूषोत्तमकडे राहू नये, हे बयोला उमगलंय. बयो पुरुषोत्तमला म्हणते, ‘‘एक सांगू का रे?… एक आई म्हणून मी जन्मभर यांच्यावर किती जरी आदळआपट केली, चरफडले, तरी यांची बायको म्हणून माझा ऊर भरून यायचा. खोटं नव्हे, आता सांगते, त्या वेळी ते जसे बोलले, जसे वागले, तसे वागले नसते, तर माझ्या मनात त्यांचा रथ कधीच जमिनीला लागला असता रे!’’ आणि आपल्याला नरहर कुरुंदकर या नाटकाच्या प्रस्तावनेत म्हणतात त्याची प्रचीती येते- ‘बयोचा एक गाभा, ज्या धातूनं भानूंची (नानासाहेबांची) मूर्ती घडली, त्याच धातूचा आहे.’ हे लग्न, हे हाल, हे कष्ट बयोनं कौतुकानं घेतले आहेत. ही कोणी नुसतीच अन्यायानं होरपळलेली, दुर्बल, सामान्य स्त्री नाही, तर याची तिनं निवड केली आहे. आता या क्षणी ती मुलाचीही बाजू समजून घेऊन मनात राग, आकस न ठेवता एक नवीन प्रवास सुरू करण्याचा घाट घालतेय. तिच्यातला गोडवा अजून टिकून आहे. तिनं साधलेला तोल अचंबित करतो, सुखावून जातो. नानासाहेबांच्या निकामी झालेल्या अर्धांगाची उणीव बयो भरून काढतेय. म्हणूनच कुरुंदकर म्हणतात, ‘बयोमुळे हिमालय उभा राहिला आहे, नाटक उभं राहिलं आहे. आणि बयो तर उभीच आहे!’
shrujaprabhudesai@gmail.com