डॉ नंदू मुलमुले

वृद्ध आईबापानं थोडं नव्या पिढीशी जुळवून घ्यायलाच हवं, ही अपेक्षा चुकीची नाही. पण त्याच वेळी नव्या पिढीनंही जुन्या पिढीची मूल्यं आणि त्या मूल्यांमुळे त्यांना बदलताना येणाऱ्या अडचणी समजून घ्यायला हव्या. दोन्हीपैकी कोणतीही पिढी ‘आपलंच खरं’ म्हणायला लागली, तरी तिला ‘जुनी पिढी’च म्हणावं लागेल! कुठे आग्रह धरत, तर कुठे नमतं घेत दोन पिढ्यांमध्ये पूल बांधावा लागेल.

जुन्या पिढीची व्याख्या काय? जिला बदलत्या मूल्यांशी जुळवून घेता येत नाही ती पिढी जुनी ठरते. मग त्या पिढीचं प्रतिनिधित्व वृद्ध करोत किंवा तरुण. पण मग अजून एक प्रश्न उरतो; मूल्यं फक्त नव्या पिढीसाठी बदलतात का? नवं वास्तव जसं तरुणांसाठी असतं, तसं जीवनाची उतरण उतरणाऱ्यांसाठीही निर्माण होत असतं. ते वास्तव स्वीकारणं, किमान समजून घेणं नव्या पिढीचंही काम. आणि नसेल स्वीकारता येत, तर तीही पिढी जुनीच म्हणायची!

‘‘आप्पा, तुमचं तिकीट काढू ना? मे महिन्यात थेट न्यूयॉर्क विमानप्रवासाचे दर सगळ्यांत कमी आहेत. तिथून आंतरदेशीय प्रवासदरही कमी खर्चाचा आहे. अनायासे शनिवार आहे, मी येईन घ्यायला तुम्हाला,’’ अजितनं संगणकावरची नजर न हटवता वडिलांना विचारलं. त्याची आई यावी ही सुनेची इच्छा; कारण नातवंडांना सांभाळणं, स्वयंपाकात मदत. वडील यावेत ही अजितची इच्छा; कारण ते एकटे राहिले तर काळजीचा एक किडा मेंदूत किटकिट करत राहणार.

महिनाभराच्या सुट्टीवर तो नाशिकला आला, की जाण्याच्या आठ दिवस आधी आईवडिलांची तिकिटं काढणं हाच त्याचा कार्यक्रम असायचा. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेला गेला, तेव्हा त्याचा नव्या नवलाईचा अमेरिका दर्शनाचा आग्रह म्हणून, नंतर एकदा दोघंही सूनबाईला मदत म्हणून असे दोनदा आप्पा तिथे जाऊन आले होते. तीन महिन्यांचा मुक्काम पोरानं वदवून घेतला होता, मात्र महिनाभरात आप्पा कंटाळले. पोरांना वाईट वाटेल म्हणून चेहऱ्यावर तसं दिसू नये याचा ते आटोकाट प्रयत्न करत होते. पण सूनबाईनं ताडलंच- ‘‘आप्पा दिवसभर तोंड लटकवून वावरतात. कुठे चला म्हटलं की नाहीच म्हणतात. फारच आग्रह केला की जबरदस्तीनं तयार होतात. पूर्वी बंटीबरोबर उत्साहानं खेळायचे. आता त्याच्या हातात एखादं पझल देऊन सोडून देतात. मग आईंना किचन सोडून त्याच्यामागे धावावं लागतं.’’ सुनेनं अजितजवळ कैफियत मांडली.

हेही वाचा : ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

‘‘आप्पा कंटाळलात का? एखादं ग्रंथालय जोडून देऊ का? अगदी पायी चालण्याच्या अंतरावर आहे. वेळ जाईल… परतीचं तिकीट अलीकडचं करून घेऊ का? बघा, अगदीच नकोसं झालं असेल तर,’’ त्यानं आवाज निर्विकार ठेवला, तरी त्याच्या चेहऱ्यावरची नाराजीची छटा आप्पांनी टिपली. तिकिटाची तारीख बदलायची म्हणजे पैशाचं नुकसान. थेट मुंबईहून नाशिकच्या प्रवासाचं नियोजन नव्यानं आखणं. पुढल्या महिन्यात फ्लोरिडाच्या सहलीचं एक तिकीट रद्द करणं… एक ना दोन!

‘‘नाही रे, येतो कंटाळा असाच,’’ त्यांना ‘इथे तुझ्याकडे’ असं म्हणायचं होतं, ते न म्हणताही अजितच्या लक्षात आलं. ‘‘वय झालंय,’’ आप्पा बोलले आणि त्यांनी मनातल्या मनात जीभ चावली. वय झालंय, हा राग आळवला की अजितला भयंकर राग येतो हे ते विसरलेच होते. वयच विसरण्याचं, त्याला ते काय करणार! ‘‘वय झालं म्हणायला काय झालं? इथे अमेरिकेत पाहा, ऐंशी वर्षांची माणसं जॉगिंग करतात, सायकलिंग करतात, हौसेनं तंबूत राहतात, जगभर फिरतात. नव्वदीच्या बाया मेकअप करतात, नाचतात, उत्साहानं समुद्रसहली काढतात,’’ कधी तरी त्यानं मायबापाला अमेरिकन संस्कृतीचे काढे पाजले होते. ‘पण अमेरिकी पोरं मायबापांना आपल्या कुटुंबाच्या देखभालीला बांधून घेत नाहीत. ‘बेबीसिटिंग’ जाऊ देत, बाळंतपणाला- देखील यावं अशी अपेक्षा करत नाहीत, त्यांच्या आयुष्यात दखल देत नाहीत, स्वतंत्र राहू देतात,’ हे सांगायचं आप्पांच्या ओठांपर्यंत आलं होतं. पण ते काही बोलले नाही. वाद घालून कुणी आपल्या मताशी सहमत होत नसतो. भांडणानं फक्त संवाद बंद पडतो, एवढं त्यांना ठाऊक होतं. ‘‘नाही रे! राहिलेच किती दिवस आता? दोन महिने तर ‘यूँ’ जातील,’’ आप्पा बोलले खरे, पण आपण दोन महिने जाण्याची वाट पाहतो आहे याची नोंद पोरानं घेतली हे त्यांना जाणवलं.

ते वर्ष असंच गेलं. मग एकदा तो फक्त आईला घेऊन गेला. म्हातारीला नातवांची आठवण येत होती, मात्र त्यांच्या मागे धावून दमछाक करून घेणं आता अवघड आहे याची तिला जाणीव होऊ लागली होती. जरा वेळ बरं वाटतं, मात्र चोवीस तास पोराच्या संसाराला बांधून घेणं कठीण. तिला नाशिकची, कानडे मारोतीच्या वाड्याची आठवण येई. त्यात बरं, की या वेळी आप्पांनी तिचं आगावू परतीचं तिकीट काढू दिलं नाही. थोडे पैसे जातील, पण मनात येईल तेव्हा परत येता येईल, हा विचार.

हेही वाचा : ‘एका’ मनात होती : काळिमा!

झालंही तसंच. आजी दीड महिन्यातच परतली! तिच्या तब्येतीचे चढउतार होत होते. अमेरिकेत एकतर हृदयविकाराचे उपचार महागडे, त्यात डॉक्टरची वेळ मिळणं कठीण. नाशिकला नेहमीच्या डॉक्टरला दाखवल्याबरोबर प्रकृती ताळ्यावर आली. मात्र दोन महिन्यांनंतर जो मोठा झटका आला, तो काही क्षणांत आयुष्य संपवूनच गेला. आप्पांनी प्राक्तन स्वीकारलंच होतं. अजितची धावपळ झाली खरी, मात्र त्र्यंबकेश्वरला सगळे विधी यथासांग पार पडले. मागच्या वेळच्या झटक्याला डॉक्टरांनी आईची हृदय-स्थिती केवळ वीस टक्के सक्षम आहे याची कल्पना दिलीच होती, त्यामुळे मनाची तयारी झाली होती.

निघताना पोराला आप्पांनी या वेळी स्पष्ट सांगितलं, की ‘‘मी आता अमेरिकेत येणार नाही. इथे माझे स्नेही आहेत, नातेवाईक आहेत.’’ (आप्पांची चुलतबहीण जवळच राहायची) तेव्हा अजितनं काळजी करू नये. चार दिवसाला बोलणं होतं, व्हिडीओवर दर्शन होतं, प्रकृतीची विचारपूस होते… अजून काय हवं? बापाची प्रकृती ठीक आहे तोवर ठीक, पुढचं पुढे पाहू, हा विचार करत पोरगा परतला.

अशीच काही वर्षं गेली. आप्पा थकले. किरकोळ तक्रारी सुरू झाल्या. खरं म्हणजे त्या आप्पांनी अजितला सांगितल्याच नव्हत्या, पण त्याला नातेवाईकांकडून कळाल्या. अशा तक्रारी सांगून पोराच्या काळजीत भर नको, हा आप्पांचा विचार. शिवाय त्या ऐकल्यावर पुन्हा त्याच्या तिथे येऊन राहण्याच्या आग्रहाला बळकटी येईल ही आप्पांची भीती. माणूस मृत्यूपेक्षा मृत्यूच्या अनपेक्षिततेला घाबरतो. जो बेसावध गाठतो, त्याचा काय भरवसा द्यावा? पोरानं अमेरिकेतल्या नोकरीचा विस्तारित कालावधी सोडून देत मुंबईला बदली करून घेतली. तसंही अमेरिकेचं नागरिकत्व मिळणं अवघड आणि व्हिसाचे नियम सतत बदलते. हे कारण होतंच, पण त्यात महत्त्वाचं म्हणजे गरज पडली तर आप्पांना भेटता यावं.

‘‘आप्पा, मुंबईला येता?’’ ‘कायमचे’ हा शब्द उच्चारला नाही. त्याला उत्तर माहीत होतं.
‘‘जरूर येतो. या आठवड्यात समूहाचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन संपतंय. ते आटोपलं की येतो आठ-पंधरा दिवसांसाठी,’’ आप्पांनी कायमचं येण्याचा प्रश्न निकालात काढला.
मुंबईत अजितनं नोकरी सोडून भागीदाराबरोबर फर्म काढली. व्यवसायात जम बसला, तशी तिची नाशिकला शाखा निघाली. तिथे त्यानं गंगापूर रोडला मोठी सदनिका घेऊन ठेवली होतीच. त्याच्या नाशिक चकरा होऊ लागल्या. आप्पांच्या भेटी होऊ लागल्या.
आता आप्पा नव्वदीजवळ आले. अजितनं साठी ओलांडली. त्याची मुलं आपल्या आवडीच्या क्षेत्रात जगात विखुरली होती. आता अजित जवळजवळ नाशिकातच राहायला आला. मात्र आप्पांचा मुक्काम अजून त्यांच्या वाड्यातच. आताशा रोज सकाळ-संध्याकाळ पोरगा फोन करी. आप्पांची नजर कमजोर झाली होती, थोडं ऐकायला कमी येत होतं, मात्र स्वत:चं सगळं व्यवस्थित करणाऱ्या आप्पांचा जीव वाड्यातच रमायचा. क्वचित ते गंगापूर रोडला अजितच्या सदनिकेत येत, गप्पा मारत आणि परत जात. एकदा आपल्या आलिशान गाडीतून त्यांना परत सोडताना पोरानं छेडलंच, ‘‘आप्पा, मी अमेरिका सोडली, मुंबई सोडली, आता तरी तुम्ही माझ्याकडे राहायला या?…’’
‘मला काळजीत ठेवण्यात तुम्हाला कसला आनंद मिळतो?’ असं काही मुलगा म्हणाला नाही, पण आप्पांना ते ऐकू आलं. अगदी स्पष्ट!

हेही वाचा : स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

‘‘माझं मन तुझ्या ‘सिरीन मेडोज्’मध्ये रमत नाही, काय करणार?’ आप्पा बोलू लागले. आतापर्यंत न बोललेले सांगू लागले. ‘‘मी हट्टी, अडेल म्हातारा आहे असं तुला वाटत असेल… साहजिक आहे. मात्र अमेरिका जसं तुझं वास्तव, तसं नाशिकचं घर माझं वास्तव! नवनवीन आव्हानं स्वीकारणं ही नव्या पिढीची मूल्यं. त्या जगात निवृत्त पिढीचं मन रमणं शक्य नाही. आपल्या मुळांना धरून ठेवणं, एकमेकांच्या सुखदु:खात साथ करणं, मैत्र जपणं, हे माझ्या पिढीचे मूल्य. कोणी कोणाचं सांभाळायचं?… माणसं सहलीला जातात, नवं जग पाहतात, मात्र तिथे मुक्काम ठोकत नाहीत. आठ-पंधरा दिवसांच्यावर तिथे करमत नाही. पुन्हा आपल्या घरी परततात. तुझं जग माझी सहल असेल, मुक्काम नव्हे! जसे तुम्ही सणवारी, सुट्ट्यांची सोय पाहून इथे येता, ती तुमची सहल, मुक्कामाचं ठिकाण नव्हे. हे वास्तव जसं तुम्ही स्वीकारता, तसं माझं वास्तव तुम्ही स्वीकारलं पाहिजे. आई-वडिलांनी मुलांना पोटाशी धरून ठेवू नये, त्यांची प्रगती खुंटेल. मुलांनी आई-वडिलांची नाळ धरून ठेवू नये, त्यांची सद्गती खुंटेल! ज्याचा त्याचा प्रश्न! तुमच्या आयुष्याला मी पुरणार नाही, माझ्या आयुष्याला तुम्ही आपल्या जगाशी जोडू नये हेच खरं. मी अखेरपर्यंत सुखात राहावं असं तुम्हाला वाटतं ना? आपले बव्हंशी आयुष्य जिथे गेलं, तिथे उर्वरित जावं हे सुखाचं वाटणं, यात काय वावगं?’’ आप्पा क्षणभर थांबले. वाडा जवळ आला होता, गाडी मंदावली. पोरानं स्टिअरिंगवरचा हात काढला. वडिलांच्या हातावर ठेवला. गाडी पाहताच गल्लीत फेरफटका मारणारे राणे, कदम जवळ आले. ‘या आप्पा, रमीचा डाव टाकू. मस्त सिक्वेन्स जमला होता मघाशी! काय रे अजित?’’
आप्पा उतरले. अजितनं त्यांच्या मित्रांकडे हसून पाहिलं. दोन्ही पिढ्यांचा सिक्वेन्स जमला.

nmmulmule@gmail.com