डॉ नंदू मुलमुले
हिरवं पान पिकत जाणं हा सृष्टीचा नियम. वृद्धत्व हा काही आजार नव्हे, ती शरीराच्या पेशी पिकत जाण्याची प्रक्रिया. मात्र बुद्धीशी संबंधित मेंदूच्या चेतापेशींचा तुलनेनं कमी वयात आणि वेगानं ऱ्हास होत जाणं हा विकार. कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये वादळ घेऊन येणारं एक स्थित्यंतर. ते झेलता येणं हे सगळ्यांना जमणं कठीण, कारण वागणूक कुठे संपते आणि विकार कुठे सुरू होतो याची सीमारेषा पुसट असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरिताताई पहिल्यांदा मानसतज्ज्ञ डॉ. शेखरकडे आल्या तेव्हा त्या तशा वृद्ध दिसत नव्हत्या. सोबत आप्पा होते, त्यांचे पती. मिश्कील म्हातारा… शेखरचं निरीक्षण.

‘‘काय आहे डॉक्टर, हिच्या ना आजकाल लक्षात राहत नाही, असं ती म्हणते. म्हणजे, पोरगा, सूनदेखील तसंच म्हणतात. सगळ्यांच्या आग्रहावरून आम्ही आलोय.’’ आल्या आल्या आप्पांनी खुलासा केला.

मध्यम बांधा, व्यवस्थित नेसलेली बारीक लाल काठाची पांढरी सुती साडी, नुकतेच डाय करणं सोडून दिलेले, चोपून बांधलेले काळे-पांढरे-करडे केस, सुरकुतल्या उजळ चेहऱ्यावर मात्र ठाम भाव.

‘‘उपप्राचार्य पदावरून निवृत्त झालीय ती, मात्र सगळ्यांना शिकवते अजूनही!’’ आप्पांनी टिप्पणी केली. सरिताताईंना हा विनोद फारसा आवडला नाही. त्यांनी चेहरा कोरा ठेवला. असा प्रसंग आप्पांवर नेहमी येत असणार. शेखरच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं, ‘‘तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं ते,’’ तो सरिताताईंकडे वळला. ‘‘…म्हणजे, शिकवण्याबद्दल नाही! तुमच्या विस्मरणाबद्दल,’ त्यानं खुलासा केला.

‘‘हल्ली जरा विसरायला होतं खरं. म्हणजे, रस्त्यात कुणी माणूस भेटला तर लगेच आठवत नाही नाव. अडखळायला होतं. मग चांगलं नाही वाटत, मला आणि समोरच्यालाही!’’

‘‘आणि मलाही,’’ आप्पांनी तोंड घातलं. ‘‘अहो, परवा माझ्या आतेबहिणीचं नाव विसरली ही. तिच्या हातच्या सांभारवड्या इतक्यांदा खाल्ल्या असतील हिनं नागपूरला गेल्यावर.’’

‘‘हो डॉक्टर, नावं जास्त विसरते मी. माणसांची, वस्तूंची, ठिकाणांची…’’ सरिताताईंचा सूर नरमाईचा झाला.

‘‘परवा तर कहर झाला, ही आंबाडीच्या बोंडांची चटणी कशी करायची ते विसरली! अहो आयुष्य गेलं तिचं ती चटणी करण्यात,’’ आप्पांनी कैफियत मांडली आणि शेखरचे डोळे चमकले. ‘‘आंबाडीची चटणी? सरिताताई तुम्ही विदर्भातल्या? अहो माझं आजोळ अमरावतीचं. नेमकं सांगायचं तर अचलपूरचं. एलीजपुर-परतवाडा! मग आंबाडीची भाजी, बोंडांची चटणी, पंचामृत… दह्यात भिजवून वाळवून तळलेल्या मुळ्याच्या शेंगा! झालंच तर हेटीचे भजे, खरपूस भाजलेलं थालीपीठ, वरणफळं,’’ शेखरनं आवडीच्या पदार्थांची यादी पूर्ण केली.

‘‘पण सगळ्यात आवडती आंबाडीची चटणी, ती विसरली ही!’’ आप्पांनी मध्येच डॉक्टरांना आठवण करून दिली. मग बायकोला वाईट वाटेल म्हणून स्वत:च म्हणाले, ‘‘तसा मीही विसराळूच आहे. लग्नाचा वाढदिवस दरवर्षी विसरतो, पण मी काही तरी विसरलोय हे मात्र बरोबर लक्षात राहतं!’’

सरिताताई अस्वस्थ झाल्या. ‘‘स्मरण-विस्मरणाचा कसला खेळ आहे हो हा?’’

‘‘सांगतो. वृद्धावस्थेत नव्या गोष्टींची नोंद होणं कमी होत जातं. याचं एक कारण म्हणजे आपली आठवणींची डिस्क पूर्ण भरलेली असते. आयुष्यात घडलेल्या असंख्य घटनांच्या जंत्रीनं मेंदूचं कपाट पूर्ण भरून जातं. आपल्या आठवणींची लक्षात राहण्यासाठी, मेंदूत जागा मिळवण्यासाठी एकमेकांत स्पर्धा असते! या स्पर्धेत तीव्र भावनिक आठवणी अधिक जागा मिळवतात.’’ शेखरनं खुलासा केला.

‘‘एकदम पटलं. किती दिवाळ्या झाल्या, पण माझ्या आईनं पहिल्या दिवाळसणाला हिला दोनशे रुपयांची- नणंदेपेक्षा स्वस्त साडी दिली, ही गोष्ट हिच्या डोक्यात कायम! विसरली म्हणते, पण आपण विसरलो हे मात्र पक्कं लक्षात ठेवते!’’ आप्पांची मजेदार टिप्पणी.

‘‘तुम्ही थांबा हो!’’ सरिताताईंना आपली समस्या जाणून घ्यायची होती.

‘‘मला स्मरणशक्ती अचानक दगा द्यायला लागलीय, हा वयाचा भाग की अजून काही?’’

‘‘एमसीआय- माईल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. म्हणजे मेंदूचा सौम्य ऱ्हास. साठी पार केलेल्या अनेक जणांना याचा अनुभव येतो,’’ शेखरनं त्यांची समजूत घातली खरी, पण ही ‘डिमेन्शिया’ची सुरुवात असू शकते… त्याच्या मनात विचार चमकून गेला.

‘‘सरिताताई, सकाळची चालायला जायची फेरी चुकवू नका. आवडत असल्यास योगासनं करत जा. फळं, पालेभाज्या, दही घेत जा, पण आहार मोजका असू द्या. जितकं कमी जेवाल, तितकं अधिक जगाल. शब्दकोडी सोडवत जा. नवनवीन विषयांची पुस्तकं आवर्जून वाचा. फिरायला जाताना रोज वेगवेगळ्या रस्त्यानं जावं, गाण्याच्या भेंड्या लावाव्यात, आप्त-मित्रांना भेटत राहावं!’’ शेखरनं महत्त्वाच्या टिप्स देऊन काही गोळ्या लिहून दिल्या.

मध्यंतरी बरेच दिवस गेले. मग एके दिवशी सरिताताई पुन्हा आल्या. या वेळी आप्पांबरोबर त्यांची सून कवितादेखील होती. चाळिशीतला समंजस चेहरा, मात्र डोळ्यांत एक दुखरा भाव!

सरिताताईंचा चेहरा मात्र विस्कटल्यासारखा.

‘‘डॉक्टर, तुमच्या सल्ल्यानं बरेच दिवस आईंना फरक पडला. मात्र अलीकडेच पाय घसरल्यामुळे हेअर फ्रेक्चर झालं. चालणंफिरणं बंद झालं. चिंता करायला लागल्या. तशात पुन्हा विस्मरण वाढलं आहे. हल्ली तर त्या आपण चहा घेतलाय, जेवलोय हेही विसरतात. पुन:पुन्हा मागतात. इतकं कानकोंड्यासारखं होतं! परवा तर…’’ बोलता बोलता कविताच्या डोळ्यांत पाणीच आलं. आप्पांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. सरिताताई हे सारं अलिप्तपणे बघत होत्या. भान नसल्यासारखं. मग आप्पाच सांगायला लागले. ‘‘काय झालं डॉक्टर, परवा माझी मुलगी आली यूएसवरून. दुपारचे दोन वाजले होते. सूनबाईनं बाराच्या सुमारासच हिला जेवण दिलं होतं. पण ही विसरली. मुलीला पाहून म्हणाली, ‘बघ, मला अजून कुणी जेवणच दिलं नाही.’ नणंद भावजयीकडे पाहायला लागली आणि भावजय सासूकडे! नंतर मी मुलीला समजावून सांगितलं. आणि तिनं पुढच्या काही दिवसांत स्वत: पाहिलंच सगळं. काय करणार! गैरसमज होतात अशा आजारामुळे.’’ आप्पा हताश होत म्हणाले.

शेखरनं सरिताताईंकडे पाहिलं. त्या आपल्याच विश्वात होत्या. ‘‘काय ताई, आंबाडीची चटणी मला शिकवणार ना?’’ त्यांचे डोळे क्षणभर लकाकले. चेहऱ्यावर फिकट हसू उमटलं… क्षणभरच! मग त्या आपल्याच दुनियेत बुडाल्या.

‘‘आप्पा, कविता, सरिताताईंना ‘अलझायमर्स डिमेन्शिया’ झालाय. स्मृतिभ्रंश. हा आजारच असा आहे, ज्यात सुरुवातीला बुद्धीचा, मग स्मरणशक्तीचा ऱ्हास व्हायला लागतो. जेवलेला जेवल्याचं विसरतो. त्यात तुमचा दोष नाही. मागच्या वेळी तुम्ही लवकर आल्यामुळे आपण त्याची गती काही वर्षं रोखू शकलो. पण आता मात्र सरिताताईंना त्यानं गाठलं आहे.’’

‘‘मग आता पुढे काय?’’ आप्पा साहजिकच काळजीत पडले. शेखरनं काही तपासण्या सांगितल्या, औषधं लिहून दिली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.

‘‘माझी यूएसची मुलगी म्हणतेय, की आईला तिकडे नेऊ का?’’ आप्पांनी चाचरत विचारलं. ‘‘नाही. अशा रुग्णांचे भोवताल अचानक बदलू नये. त्यांचा आपल्या परिसराशी एक अनुबंध असतो. त्याच्या आधारे शक्ती क्षीण झालेला मेंदू आपल्या परिसरसापेक्ष अस्तित्वाचं भान टिकवून असतो. तो आधार काढून घेऊ नये.’’

‘‘मी घेईन आईची सारी काळजी,’’ कविता उत्स्फूर्तपणे बोलली. तिची बाजू आप्पांनी डॉक्टरसमोर उचलून धरल्यामुळे तिचा चेहरा समाधानी दिसत होता.

दरम्यान, काही महिने गेले. एके दिवशी शेखर एका होम व्हिजिटवरून येत असताना रस्त्यात त्याला आप्पा दिसले. त्यानं गाडी बाजूला घेतली. ‘‘चला ना डॉक्टर, जवळच घर आहे. त्या निमित्तानं तुमचा रुग्ण दिसेल!’’ आप्पांच्या आग्रहापेक्षा सरिताताईंची तब्येत आणि कवितानं केलेला इंतजाम पाहायला शेखर आनंदानं तयार झाला.

सुबक नेटकी खोली. बसक्या दिवाणावर एक स्वच्छ फुलाफुलांची बेडशीट टाकलेली. सरिताताई त्यावर एक तलम चादर पांघरून शांत पहुडलेल्या. बाजूच्या स्टुलावर फक्त एका ताज्या निशिगंधाची दांडी असलेली नाजूक फुलदाणी. उदबत्तीचा दरवळ. खिडकीला तलम पडदे, तरीही भरपूर प्रकाश. समोर भिंतीवर ठळक तारखांचं कालनिर्णय. वर एक स्पष्ट तास-मिनिट वेळ दाखवणारं घड्याळ. कोपऱ्यातल्या मुठीएवढ्या ध्वनिवर्धकातून संतूरचं मंद संगीत आसमंतात विरघळत होतं.

‘‘वाह!’’ शेखरच्या तोंडून उत्स्फूर्ततेनं शब्द बाहेर पडले. ‘‘डिमेन्शिया रुग्णाची इतकी चांगली बडदास्त मी कुठेही पाहिली नाहीये.’’ ‘‘एवढंच नाही… सूनबाई दररोज तिला नवा, स्वच्छ गाऊन नेसवते, चादर बदलते. स्वत: तिला खाऊ घालते. वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्या वाचून दाखवते. आता तिला त्यातलं कितपत कळतं माहीत नाही…’’ आप्पांच्या डोळ्यांत पाणी होतं. डॉक्टर कविताकडे वळले, ‘‘अशा रुग्णाची एवढी परफेक्ट काळजी घ्यायला कुणी शिकवलं तुम्हाला?’’

‘‘माझ्या आईनं तिच्या सासऱ्यांची, माझ्या आजोबांची सेवा केलेली पाहिलीय मी लहानपणी. त्यांना पक्षाघात झाला होता. बाबा म्हणायचे, कशाला इतकं करत बसतेस? एखादा माणूस लावू. त्यांना काहीही भान नाहीये! आई म्हणायची, पण मला भान आहे ना! या घरात पाऊल टाकल्यापासून त्यांनी माझी वडिलांसारखी पाठराखण केली आहे.’’ कविता भावुक झाली. ‘‘डॉक्टर, हेच माझ्याही बाबतीत खरं आहे. संजयबरोबर माझं लग्न होऊन मी या घरात आले, तेव्हापासून आईंनी मला मुलीसारखं वागवलं आहे. म्हणूनच त्या दिवशी त्यांनी मी जेवायलाच दिलेलं नाही म्हटल्यावर मला धक्का बसला. एकांतात मला काही बोलल्या असत्या, तर वाईट वाटलं नसतं. कदाचित त्यांच्या समजुतीखातर मी पुन्हा थोडंसं जेवण वाढून आणलं असतं. पण आरोप नणंदेसमोर झाला. अमेरिकेहून चार दिवसांसाठी आलेली त्यांची मुलगी काय गैरसमज करून घेईल, या विचारानंच मी उद्ध्वस्त झाले. पण आप्पांनी मला साथ दिली. वाटलं, आपली सेवा कुणासमोर सिद्ध होते आहे की नाही, एवढ्यापुरतीच आहे का? माझ्या आईनं केलेली सेवा मी पाहिली होती. माझी मुलं माझ्याकडून ती झालेली पाहताहेत. आमच्यावर ती वेळ आलीच, तर त्यांना हे आठवो… अजून काय!’’ कविताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

शेखरनं पाहिलं, आतापर्यंत निर्विकार वाटणाऱ्या सरिताताईंच्या चेहऱ्यावरही हलकं स्मित तरळलं. त्यांनी आपला कृश हात उचलून सुनेच्या गालावर फिरवला. संतूरमधून मारवा बरसत होता… आयुष्याच्या कृष्णकिनारी अजून काय हवं?…

nmmulmule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chaturang old age mental illness psychiatrist amy