– डॉ भूषण शुक्ल

मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागणार म्हटल्यावर अनेक आईबाबांच्या तणावाला सुरुवात होते. मुलांना ‘बोअर’ होणार नाही याची काळजी कशी घ्यायची आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद कशी करायची, या चिंतेत ते बुडून जातात. आईबाबांच्या काळी मात्र सुट्टी यापेक्षा वेगळी होती आणि आजीआजोबांची सुट्टी तर त्यांच्याहीपेक्षा वेगळी. या दोन्ही मोठ्या पिढ्यांच्या आईबाबांना त्यांच्या मुलांच्या सुट्ट्यांची इतकी चिंता कशी नसायची?… तसं आताच्या मुलांबाबतीतही होऊ शकेल का?…

संध्याकाळी उन्हं परतायला लागली तशी उज्ज्वलाबाईंची नजर घड्याळाकडे गेली. ‘‘बापरे, सहा वाजत आले की! या मुलांच्या नादात वेळ कसा जातो कळतच नाही. रेवती येण्याची वेळ झाली.’’ असं मनाशी म्हणत नंतर आपल्या खणखणीत आवाजात त्यांनी मुलांना सांगितलं, ‘‘कम ऑन बॉईज अँड गर्ल्स, उरलेलं घरी जाऊन संपवा. तुम्हाला आपली नेहमीची पद्धत माहिती आहेच. सी यू ऑल टुमॉरो!’’ त्यांच्या अधिकारी आवाजाला आणि हसऱ्या चेहऱ्याला प्रतिप्रश्न करणं हे आजपर्यंत कोणाला जमलं नव्हतं. त्यामुळे ही छोटी मुलं आपलं निमूटपणे ऐकणार याची त्यांना खात्री होतीच.

हेही वाचा – सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

सर्व मुलांनी आपली वह्या-पुस्तकं आवरली आणि व्यवस्थित नजर मिळवून, हसून, ‘‘थँक्यू उज्ज्वला ऑण्टी. सी यू सून!’’ असं म्हणत एक एक करून निघून गेली. एका आठवड्यात हे सर्व मॅनर्स त्यांच्या अंगवळणी पडले होते. आपली दोन नातवंडं घेऊन, आधारासाठी हातातली काठी टेकत टेकत ऑण्टी घरी निघाल्या. ‘‘आता अर्ध्या तासात मम्मा येईल. आज चहा कोण करणार आणि टेबल कोण लावणार?’’ दोन्ही मुलांनी कामं वाटून घेतली आणि घरी पोहोचताच पटापट कामाला लागले. त्यांची आई, रेवती, घरात आली तेव्हा नऊ वर्षांच्या आरोहीनं सगळ्यांसाठी चहा केला होता आणि ११ वर्षांचा आर्यन पातळ कापलेल्या काकडी आणि टोमॅटोचं सँडविच बनवत होता.

‘‘तू आलीस की कशी सुतासारखी सरळ असतात बघ! अगदी गोड वाटतात. मी एकटी असते तेव्हा भुतं होतात यांची. तू इथे कायमची राहायला ये ना!’’ असं म्हणत रेवतीनं एक सँडविच घेतलं. ‘‘आरू, चहा मस्त जमलाय… आणि आर्यन, सँडविच काय परफेक्ट झालंय! बटर आणि चटणी बरोबर चवीपुरती आहे. व्वा, मजा आ गया!’’ अशी आईकडून चपखल स्तुती झाली. आजीनं, ‘‘वेल डन कंपनी! आय अॅम प्राउड ऑफ यू!’’ असं म्हणून त्यांना एकदम खूश करून टाकलं. मुलंच ती. पटकन खाऊन, आवरून खेळायला खाली निघून गेली. आणि इकडे मायलेकींनी गप्पा टाकायला सुरुवात केली. ‘‘मग आज काय केलं तुमच्या ‘समर क्लब’मध्ये? किती मुलं आली होती?’’

‘‘आज होती सगळी. पण आता एक एक करून गावाला जातील सगळी. सोमवार आमचा शेवटचा दिवस ठरलाय.’’

‘‘आज आम्ही ‘फन विथ नंबर्स’ खेळलो. खरं तर ‘मॅथ’च होतं! पण ते म्हटलं तर पोरं बिथरतात. म्हणून वेगळं नाव दिलं. आज त्यांना ६,१७४ हा ‘कापरेकर कॉन्स्टंट’ आणि १,७२९ हा ‘रामानुजन नंबर’ शिकवला.’’

‘‘खूप मजा आली असेल ना मुलांना? तू शिकवायला असलीस की काय विचारायचं! मज्जाच मज्जा.’’ रेवती म्हणाली आणि लेकीकडून अशी दिलखुलास दाद ऐकून उज्ज्वलाबाई चांगल्याच खुलल्या.

‘‘त्यांना अभ्यास इतका कंटाळवाणा होतो, की आकड्यांमध्ये इतकी गंमत असते हे कळतच नाही. असं काही दाखवलं की अगदी हरखून जातात बघ! आज तीन वाजल्यापासून सहापर्यंत ‘फन विथ नंबर्स’ खेळलो. वेळ कसा गेला कळलंच नाही.’’

हे ऐकताना रेवतीची तंद्री लागली. शाळेची उन्हाळ्याची सुट्टी तिला आठवली. वडिलांच्या मिलिटरीमधल्या नोकरीमुळे ती भारतभर फिरली होती. उज्ज्वलाबाई गणित शिकवायच्या आणि नवऱ्याची पोस्टिंग असेल तिथे मुलीच्या शाळेतच गणित शिकवायच्या. असं त्यांचं बिऱ्हाड तिची बारावी होईपर्यंत भारतभर फिरलं होतं. दर उन्हाळ्यात ती घरीच असायची. मिलिटरी रेसिडेन्सी कॅम्पस म्हणजे भरपूर मोकळी जागा आणि भरपूर खेळ. शिवाय डझनावारी मुलं. सर्व वयांची. सकाळी लवकर उठून पोहायला जाण्यापासून सुरुवात. दुपारी फक्त जेवण आणि थोडी विश्रांती. तेवढा वेळ घरी यायचं. परत चार वाजले की बाहेर. थेट सात-आठपर्यंत. क्लबमध्ये चांगला सिनेमा असेल तर तिथेच रात्री जेवण. नाही तर पाळीपाळीनं कोणाच्या तरी घरी रात्रीचं जेवण आणि त्यानंतर पत्ते, क्विझ किंवा अंताक्षरी. सुट्टीचे दोन महिने कसे जायचे हे कळायचंसुद्धा नाही. सुट्टी संपवून सगळे शाळेत परत यायचे तेव्हा कोण जास्त काळं झालं आणि उंच झालंय हे बघितलं जायचं. ज्याला जास्त जखमा, त्यानं सुट्टीत सर्वांत जास्त धमाल केली आहे हे सगळे मान्य करायचे!

आठवडाभर आजोबांकडे जाणं झालं तर ते व्हायचं. पण ते रेवतीला आवडायचं नाही. कारण ती सगळी मंडळी घाबरट! ऊन लागेल म्हणून मुलांना घरात बसवून ठेवायची. मोठा कूलर लावून घरात बसून राहायचं, हे रेवतीला मुळीच आवडणारं नव्हतं, पण आईसाठी ती तेवढा आठवडा सहन करून घ्यायची. आपल्याला तिथे आवडत नाही, बोअर होतं, आजी-आजोबांच्या सारख्या काळजीचा राग येतो, हे तिनं आईला कधी सांगितलं नाही. पण आईला मुलीचा हा स्वभाव माहीत असल्यानं आठवडा- दहा दिवस यापलीकडे माहेरपण ठेवायचं नाही. जास्त ताणायचं नाही. थोड्यात गोडी असते, हे त्याही ओळखून होत्या.

आईचा हसण्याचा आवाज ऐकून रेवतीची तंद्री मोडली. उज्ज्वलाबाई मांजराबरोबर मस्ती करत होत्या. रेवतीला वाटलं की तिची आई मोठी झालीच नाहीये! चिरतरुण आहे. काय तो उत्साह, काय धडपड, काय हसणं! पाय फ्रॅक्चर झालाय असेच उद्योग करताना, पण म्हातारीच्या जिवाला उसंत म्हणून नाही. रेवतीला या विचारानंच हसू आलं. आपली आई बहुतेक ‘हायपर अॅक्टिव्ह’ असावी, असं तिला नेहमीच वाटायचं. ‘‘तू काय करायचीस गं सुट्टीत? तू कधी बोलत नाहीस तुझ्या लहानपणाबद्दल.’’ रेवतीनं तार छेडली.

‘‘अगं, त्यात काय सांगायचं! तू तर तो वाडा बघितलाच आहेस ना… माझ्या लहानपणी थोडा जास्त स्वच्छ होता. भरपूर बिऱ्हाडं होती. खूप लहान मुलं असायची. पूर्ण सुट्टीभर घरीच. खूप कामं असायची. वर्षभराचं धान्य साठवायचं, निवडणं-टिपणं, उन्हं दाखवणं, पापड, कुरडया, सांडगे करणं, जाजम- गोधड्या धुवायच्या, वाळवायच्या, घरं आवरायची. यातच सगळी दिवाळी आणि उन्हाळा जायचा. कुठे बाहेर जायची सोय नाही आणि परवडायचंसुद्धा नाही. नाही म्हणायला आम्ही मुली पत्ते खेळायचो, भेंड्या लावायचो, रात्री गच्चीवर झोपायला परवानगी मिळाली तर एकमेकींना भुताच्या गोष्टी सांगायचो. शिवाय दर उन्हाळ्यात नातेवाईक मंडळीत एखादं लग्न असायचंच. त्यात एक-दोन आठवडे जायचे. फार काही नाही. वेळ निघून जायचा. बोअर वगैरे झाल्याचं आठवत नाही बाई आजकालच्या पोरांसारखं.’’आणि त्या वाक्याबरोबर मायलेकी ‘आजकालची मुलं’ या विषयावर घसरल्या.

‘‘हो ना आई, आता काय करायचं गं यांचं दिवसभर? अगदी लहान होती तेव्हा ठीक होतं. पण आता मोठे व्हायला लागलेत. एकमेकांना संगत होईल म्हणून मुद्दाम दोन मुलं होऊ दिली. पण यांचे स्वभाव इतके वेगळे आहेत, की दिवसभर एकमेकांशी बोलतसुद्धा नाहीत. सोसायटीबाहेर पाठवायचीसुद्धा सोय नाही. आणि रिकामे बसले की फोन, नाही तर टॅब! टीव्ही बघायला सांगितला तर त्यावरही यूट्यूब बघतात. यांची सुट्टी म्हटली की मलाच टेन्शन येतं आता!’’

रेवतीची कुरकुर ऐकून उज्ज्वलाबाई पुन्हा एकदा जोरात हसल्या. ‘‘खरंय तुझं! मला असा कधी प्रश्नच पडला नव्हता. आपल्या कॉलनीमध्ये तुम्ही सगळे किती सुरक्षित होतात. साप-विंचू सोडले तर काळजी करण्यासारखं काही नव्हतं. दोन-तीन वेळा खायची सोय करा आणि संध्याकाळी पोरं घरी आली की एकदा विसळून घ्या! झाली सुट्टी!’’ ‘पोरं विसळून घ्यायची’ यावर दोघी यथेच्छ हसल्या.

‘‘आई, मी तर आता सुट्टीसाठी वेगळं बजेट ठेवायला सुरुवात केलीय. एक अॅडव्हेंचर कॅम्प. जंगलात, नाही तर पर्वतावर. म्हणजे एक आठवडा आटोपला. एक स्विमिंग क्लब आणि एक स्पोर्ट्स क्लब. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळची सोय. मधल्या वेळचा एक हॉबी क्लब. म्हणजे आर्ट, कोडिंग, रोबोटिक्स वगैरे. मध्ये एखादी चार-पाच दिवसांची ट्रिप कुठे तरी. घरी फ्रिजमध्ये आइस्क्रीम भरून ठेवलंय, भरपूर फळं आणून ठेवलीयेत. आणि आता शाळा परत सुरू व्हायची वाट बघायची. दुसरं काय? या वर्षी निदान तू तरी आहेस. नाही तर मी एकटी काय करणार यांचं?’’

‘‘सातवी-आठवीपर्यंत हा प्लॅन चांगला आहे. पण मुलं त्यापेक्षा मोठी झाली की मग काय करशील? मुलं ऐकणार नाहीत बघ. आता कोणी पापड, कुरडया, लोणचं घरी करत नाही. गोधड्या धूत नाही. अवघडच आहे सगळं!’’ हे सगळं ऐकताना रेवतीच्या डोळ्यांत वेगळीच चमक होती. ‘‘आई, आम्ही पाच-सहा मैत्रिणी मिळून काय विचार करतोय सांगू?… आम्ही ‘हॉलिडे क्लब’ बनवायचा म्हणतोय. मुलं चांगली ३-४ आठवडे आमच्याबरोबर येऊन राहतील. आम्ही त्यांची पाचगणीला सगळी सोय करू. खेळ, मनोरंजन, थोडं शिक्षण, योगासनं, प्राणायाम, हॉर्स रायडिंग, संस्कार वर्ग, फिल्म क्लब, सगळं काही. आणि ‘गॅझेट फ्री’ सुट्टी म्हणजे पालक मंडळी चांगली फी द्यायला खुशीनं तयार होतील. मी त्याचा पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलाय. दिवाळीचा एक महिना आणि उन्हाळ्याचे दोन महिने एवढ्या कामावर जवळजवळ माझ्या वर्षाच्या पगाराएवढे पैसे मिळू शकतात. मी पाचगणीत तीन शाळांशी बोलले आहे आणि दोन इन्व्हेस्टरसुद्धा तयार आहेत. कसा वाटतो माझा ‘स्टार्टअप’ प्लॅन?’’ ‘‘बापरे, नोकरी सोडणार तू हा हंगामी धंदा करायला? चांगलीच धाडसी आहेस तू!’’ सरळ ‘नाही’ न म्हणता अशी गुगली टाकायची आईची पद्धत रेवतीला ओळखीची होती. त्यामुळे तिनं तो विषय तिथेच सोडून दिला.

हेही वाचा – महिला व्होट बँकेचा शोध!

‘‘पण तू म्हणतेस ते खरंय. जर आईबापांना दिवसभर काम असेल आणि सगळ्यांनी नोकरी-धंदा तर करायची गरज आहेच, मग शाळा-कॉलेज वर्षभर नको का चालू ठेवायला? असली लांबलचक सुट्टी शाळा कॉलेज आणि कोर्टाला सोडून बाकी कोणाला असते बरं? एक तर सगळ्यांना सुट्टी द्या, नाही तर कोणालाच नको! आता ना, मीच या विषयावर हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करते! या असल्या सुट्ट्या बंदच व्हायला पाहिजेत…’’ उज्ज्वलाबाईंनी मुद्दाम वेगळाच फाटा फोडला.

तेवढ्यात दारातून आत आलेल्या आरोही आणि आर्यननं फक्त शेवटची काही वाक्यं ऐकली आणि त्यांची तंतरलीच. ‘‘बापरे, सुट्टी कॅन्सल? आजीचं काही सांगता येत नाही. आर्मी वाइफ आहे ती! काही पण करू शकते. डेंजर आहे ती!’’ त्यांची ही भेदरलेली अवस्था बघून आई आणि आजी मात्र परत हसण्यात बुडून गेल्या होत्या!

chaturang@expressindia.com