‘माणूस’ दिवाळी अंकासाठी १९७८ मध्ये मी ‘जौळ’ ही कादंबरी लिहिली. एका सत्य घटनेवर ती आधारलेली होती. ‘फिक्शन बेस्ड ऑन फॅक्ट्स – ‘फॅक्शन’ अशा स्वरूपाची ती होती. ती लिहिताना कादंबरी म्हणून तिच्यात कल्पनाशक्तीला भरपूर वाव दिलेला असला, तरीही वास्तव नीट समजून घेण्याचा, त्यातील विसंगतीमध्येही शक्य ती संगती शोधण्याचा, मुख्य म्हणजे त्यांत गुंतलेल्या शक्य तेवढय़ा व्यक्तींना पारखून घेण्याचा मी प्रयत्न केला.

त्यातील तीन प्रमुख व्यक्तींपैकी नायक प्रसाद हा हयात नव्हताच. राहता राहिल्या होत्या दोघी – नायिका नयन आणि तिची सासू – प्रसादची आई – एका परीने नायिकेहून कणभर अधिकच महत्त्वाची व्यक्तिरेखा – सिंधूताई. कादंबरीच्या ब्लर्बमध्ये

lokrang , cherry blossome, poet on cherry blossome, poet and cherry blossome, cherry blossome poetry, Japan cherry blossom, cherry blossom hyko, Japan cherry blossom culture, cherry blossom season, cherry blossom tradition, world s poerty on cherry blossom, hanami,
निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
Loksatta readers Reaction on lokrang article
पडसाद : आदर्शवत नेत्यांचा काळ आठवला
saleel kulkarni special post for his son shubhankar
सलील कुलकर्णींच्या लेकाचं पहिलं हिंदी गाणं! २ वर्षांचा असताना गायलेलं ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, शुभंकरसाठी बाबांची खास पोस्ट
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..

श्री. ग. माजगावकरांनी म्हटले होते, ‘‘जौळ’मधील वास्तव हे कठोर जीवनस्पर्धेत मागेमागे फेकल्या जात असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय संसाराचे आहे तितकेच करुण आणि दाहकही. याही वास्तवदर्शनाची (‘लोककथा ७८’ मधील वास्तवाइतकीच) नोंद घेतली जायला हवी.’ या कनिष्ठ मध्यमवर्गाची प्रतिनिधी सिंधूताई!

‘जौळ’ कादंबरी लौकरच पुस्तकरूपाने (मॅजेस्टिक प्रकाशन, मार्च १९८०) प्रसिद्ध झाली. तिच्यावर नाटक करता येईल का? अशा पृच्छाही निर्मात्यांकडून होऊ लागल्या. मात्र अनेक पात्रांच्या निवेदनातून साकारलेल्या आणि अनेक स्थळांवर घडणाऱ्या या कादंबरीला नाटय़रूप देणे फारच अवघड आहे, असे बहुतेकांना वाटे. नाटककार म्हणून मी हे आव्हान समजून कादंबरीतील कुठलाही महत्त्वाचा तपशील न वगळता, नाटय़माध्यमासाठी आवश्यक म्हणून फक्त शेवट बदलून कादंबरीचे तीन-अंकी नाटक केले, ते ‘माझं काय चुकलं?’ या नावाने. नाटक अतिशय यशस्वी झाले (सुमारे ५०० प्रयोग). ते गुजरातीत कांती मठिया या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने ‘कोरी आँख ने भीना हटया’ या नावाने रूपांतरित केले. नंतर कोळ्यांच्या मांगेली भाषेतही भारत तांडेल आणि रमेश पागधरे यांनी त्याचे प्रयोग सादर केले ‘याला जबाबदार कून?’ या नावाने. मुंबई दूरदर्शनवर त्याचे नाटय़ावलोकन झालेच; शिवाय कालांतराने संपूर्ण नाटकही सादर करण्यात आले. १९८५ मध्ये या कादंबरी- नाटकावर ‘माझं घर, माझा संसार’ हा चित्रपटही आला. पटकथा-संवाद माझेच होते; दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांनी केले होते. या चित्रपटाच्या कथेला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.

वरवर पाहता ‘माझं काय चुकलं?’ हे नाटक सासू आणि सून यांच्यातील नेहमीच्याच संघर्षांचे ‘लोकप्रिय’ कौटुंबिक नाटक वाटेल; परंतु इथला संघर्ष हा बराच वेगळा आहे. सिंधूताईंनी पतीच्या तरुण वयातील मृत्यूनंतर एक मुलगा आणि एक मुलगी यांना अतिशय गरिबीतही काबाडकष्ट करून वाढवले. मुले चांगली निघाली, त्यांना आईच्या कष्टांची कदर आहे हे त्यांचे एकच समाधान. मुलाचे लग्न झाले, की आपले कष्ट कमी होतील, याची खात्री. सून मिळते ती मोठय़ा घरातली, देखणी, मुलाला आवडलेली. मात्र ती ज्या घरात वाढली तिथले मोकळे, व्यक्तिस्वातंत्र्याचे संस्कार आणि सिंधूताईंचे पारंपरिक, सोवळेओवळे मानणारे विचार यांच्यात तफावत असते. प्रसादला लग्नानंतर काही काळ तरी बायकोने आपल्याकडेच पूर्ण लक्ष द्यावे, असे वाटते, ते सिंधूताईंच्या सून हातभार लावील या अपेक्षेवर पाणी सांडणारे. तिघांपैकी कोणाचेच चूक नसते, तरीही दिवसेंदिवस घरातले वातावरण धुमसत जाते. मुळात कजाग नसलेली आई – अधूनमधून माहेरी येणाऱ्या लेकीच्या आणि भाऊ बळवंत याच्या फूस लावण्यामुळे सुनेवर हात उगारण्यापर्यंत पोहोचते आणि सून नयनही तिच्या तोंडाला तोंड देते.

या संघर्षांला आणखीही एक मानवी बाजू आहे. ऐन तारुण्यात संसार सुखाला मुकलेल्या सिंधूताईंना, नवविवाहित तरुण जोडप्याच्या शय्यासुखाचा नकळत हेवा वाटू लागतो. सून आपल्याला हिणवतेय असे उगाचच वाटू लागते. त्या म्हणतात, ‘‘रात्री, कित्ती नाही म्हटलं, तरी कान बाहेरच्या आवाजाचा वेध घेतात. सगळं शांत असतं, त्यामुळं साधी पलंगाची किरकिरसुद्धा किती मोठी वाटते!.. सगळ्या जुन्या आठवणी येतात, रात्री बाहेरची चाहूल लागते तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासूनच्या.. मग वाटतं, आपलं र्अध आयुष्य वाया गेलं! जिथं आपलंच मन आपल्याला हिणवतं, तिथं सून हिणवल्याशिवाय राहणारेय?..अगो, पण इतकं हेऽऽऽ कशाला करून दाखवायचं?.. ज्या शरीराची तुला इतकी अपूर्वाई वाटते; ते एवढं उभं-आडवं मीच वाढवलंय्! आणि मलाच गो काय हुशारी सांगतायस?’’ याची दुसरी बाजू अशी, की प्रसादला मात्र आपण नयनला शरीरसुख देण्यात कुठे तरी कमी पडतो, असे वाटते. दोनच महिन्यांत नयनला दिवस गेले असतानाही, प्रसादच्या मनात हा गंड राहतोच.

मध्यमवर्गीय कुटुंबातील परस्परसंबंधांमध्ये आर्थिक ओढ ही एक महत्त्वाची बाब असते, जी कौटुंबिक नाटकांमध्ये क्वचितच दाखवली जाते. इथे मात्र सिंधूताईंना वाटते की, मुलगा सिअ‍ॅट टायर्सच्या नोकरीत चांगले पैसे मिळवतो, तर त्याने घरात अधिक पैसे द्यावेत. बायकोसाठी साडय़ा, गजरे, टॅक्स्या यांच्यावर पैसे उधळू नयेत. घरात एक माणूस वाढलं तरी तेवढेच पैसे कसा देतोस, असा त्यांचा प्रश्न, तर प्रसादचे त्यावर हिशेबी उत्तर : ‘‘माणूस काय वाढलं आई? नयन आली, पण सुमी कमी नाही का झाली? की सुमी तुझी मुलगी म्हणून तिचा विचार करायचा नाही आणि नयन माझी बायको म्हणून तिच्यावरचा खर्च तेवढा धरायचा?’’ नात्यात विनाकारण आलेल्या या कडवटपणामागे सिंधूताईंचा मुख्य राग आहे तो, नयन नोकरी करत नाही आणि आपण या वयातही काम करून पै-पैसा जमवतोय, यासाठी. ‘‘म्हटलं शिवणकाम तरी शिक. चार घरचे कपडे शिवून तेवढेच चार पैसे मिळतील.. तर म्हणाली.. ‘मी नाही विधवा बाईसारखी दुसऱ्याच्या घरची कामं करणार!’ असं म्हणाली – विधवा बाईसारखी! मला काय वाटलं असेल ऐकून? किती यातना झाल्या असतील मनाला? अगो, विधवा काय कुणी हौसेनं होतं? नशिबानंच कोसळते ना असली आपत्ती?.. माणसानं दुसऱ्याच्या वर्मी लागेलसं नाही बोलू. (डोळे टिपते.)’’ याउलट प्रसादचं म्हणणं असं की, ‘‘आता मला चांगली नोकरी आहे. घरी बसून आराम कर. तर नाही. तिचं अजून ते पूर्वीचं चालूच. कुणाची मुलं सांभाळ, कुणाला पापड – लोणची करून दे! कुठं पिशव्या करून विक!’’ आईचं हे हलकी कामं करणं आपल्या दर्जाला शोभत नाही, या विचाराने तोही अस्वस्थ आहे.

‘माझं काय चुकलं?’मधल्या सासू-सुनेच्या नात्याला असे हे बहुविध पदर आहेत. यातली नयन स्वार्थी नाही, की सिंधूताई खाष्ट नाहीत! मात्र नेहमी आढळणारे संघर्षांचे मूळ इथेही आहे, ते म्हणजे एका पुरुषावर दोन स्त्रियांनी, वेगवेगळ्या नात्यांनी का होईना, पण अधिकार सांगणे. आजवर आपले ऐकणारा मुलगा एकाएकी बायकोच्या मुठीत गेला, याचे दु:ख त्याच्या आईला होणे स्वाभाविक आहे, फक्त त्याचे प्रमाण त्या त्या स्त्रीच्या समंजसपणावर अवलंबून असते.

‘माझं काय चुकलं?’ हे केवळ सासू-सुनेच्या स्वाभाविक संघर्षांवरच बोलून थांबत नाही. कारण नाटकाच्या साधारण मध्यावर एक ‘ट्विस्ट’ येतो. आईचे सुख आणि स्वत:चे सुख यांच्या कात्रीत सापडलेल्या प्रसादला हळूहळू मरणासक्ती जाणवू लागते. ‘‘खरोखर काय असेल जीव देणं? सुटका. सगळ्या त्रासातून सुटका – शांतता. काळोख. स्वातंत्र्य.. मग वाटलं तर सहज संपवून टाकावं की आयुष्य. सिगरेटच्या पाकिटासारखं.. आत्महत्या केली तर सगळे प्रश्न सुटतील. मीच नसलो तर दोघी कशाला भांडतील?.. आपल्या जिवंत असण्याची गरज दुसऱ्या कुणाला नसते. फक्त आपली आपल्यालाच असते. मला नाही भीती वाटत मरणाची. गाडीचा धाडधाड आवाज.. पारसिकचा बोगदा.. बारला धरलेला हात अलगद सोडून दिला, तर मरण येईल हे नक्की.. सोपं आहे इथं मरणं – अगदी सोप्पं!’’

मरणाच्या या कल्पनेने झपाटलेला प्रसाद नयनची सोबत मागतो. भारल्यासारखी ती त्याच्याबरोबर जाते.. दोघे पारसिकच्या बोगद्यात गाडीतून उडी मारतात. मात्र आत्महत्येच्या या प्रयत्नात प्रसाद जागच्या जागीच मरतो आणि नयन थोडीफार जखमी होऊन तिच्या पोटातल्या गर्भासकट वाचते. तिला, तिच्या माहेरच्या डॉ. भागवतांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले जाते. माहेरची मंडळी ठरवतात, की आता तिला परत सासरी जाऊ द्यायचे नाही. तिचा गर्भपात करायचा, तिला माहेरी न्यायचे आणि शक्य झाल्यास तिचा पुनर्विवाह करून द्यायचा..

सिंधूताई अर्थातच या आकस्मिक आघाताने विदीर्ण होते. आपले काय चुकले म्हणून आपल्याला, एकुलता एक तरुण मुलगा गमावण्याची शिक्षा मिळाली हे तिला कळत नाही. आता सगळे नयनला सहानुभूती देतील आणि आपल्याला, ‘हिच्यामुळे हे घडलं’ असा दोषच देतील याची चिंताही पुत्रशोकाइतकीच मोठी असते. ती सैरभैर होते.. आता प्रसाद नाही, नयनही नाही. ज्याला वाढवू शकलो असतो असे त्यांचे बाळही नाही, एवढेच नाही, तर मुलगी आणि तिच्या सासरची माणसेदेखील आता ‘सान्यांची माणसं चांगली नाहीत. त्यांच्या इथं हे असले प्रकार झाले’ म्हणून दुरावली.. आपण आता एकटे – अगदी एकटे आहोत हे तिला जाणवते.

प्रसादचा घरातला हिस्सा, काढलेले कर्ज, त्याचा प्रॉव्हिडंट फंड इत्यादीमधला नयनचा हिस्सा ठरवण्यासाठी, तिचे स्त्रीधन परत घेण्यासाठी, थोडक्यात, पैशाचा हिशेबठिशेब करण्यासाठी, डॉ. भागवतांकडे दोन्ही बाजूंची मंडळी जमतात. सिंधूताईंबरोबर त्यांचा भाऊ बळवंतमामा असतो. दोन्ही पक्षांमध्ये भरपूर वादावादी होते. शेवटी तोड निघते, पण सिंधूताई नयनला तिचे मंगळसूत्र देणार नाही, म्हणून हटून बसतात. त्यावरून त्यांची आणि नयनची बोलाचाली होते; पण त्या ढिम्म हटत नाहीत. डॉ. भागवत एकटेच भेटून त्यांच्याशी शांतपणे बोलतात. आमचा कुणाचा तुमच्यावर राग नाही, तुम्हाला आम्ही दोष देत नाही, असे सांगून त्यांना आश्वस्त करतात. मग सिंधूताई विचारतात,  ‘‘माझा संसार अध्र्यावर संपला! मुलगा मोठा झाल्यानंतरही मी सुखाची आशा धरायची नाही का?’’

हा या नाटकातला ‘पेचिंदा सवाल’. पण डॉ. भागवत त्याला रास्त उत्तर देतात, ‘‘सुखावर तुमचा हक्कच होता सिंधूताई; पण ते हिसकावून घ्यायला गेलात, म्हणून मातीत सांडून गेलं. पोरांना म्हटलं असतंत, तुमच्या पद्धतीनं घर चालवा, तर काय झालं असतं?.. तुम्ही त्यांच्या आयुष्याला का पुरणार होता?.. थोडा मनस्ताप झाला असता; पण म्हणायचं, हा संसार माझा नाहीच; मग कशाला मी जे ते मनाला लावून घेऊ?’’ डॉक्टरांनी सांगितलेली ही निरासक्ती सिंधूताईंना समजत असते, पण उमजणं कठीण जातं, एवढंच! त्या डॉक्टरांकडे एक कबुलीजबाब देतात. ‘‘मघा मंगळसूत्रासाठी हटून बसले. मला काय उपयोग आहे रे त्या मंगळसूत्राचा? पण डॉक्टर सगळंच चाललं की कसलं तरी चिंधूक पकडायचं नि म्हणायचं, हे एवढं तरी मी जाऊ देणार नाही!.. कुठं तरी अहं असतोच! पराभव कबूल करायचा नाही. म्हणून मंगळसूत्र देत नाही म्हटलं, एवढंच!’’

अहंकाराचा निचरा झालेल्या सिंधूताई पुन्हा नयनला भेटतात. तिला मंगळसूत्र देतात. म्हणतात, परत ये आपल्या घरी. आपल्या बाळाला घेऊन. मी सांभाळीन त्याला. तू नोकरी कर कुठं तरी. डॉक्टर बघेल तुझ्यासाठी नोकरी. नाही तर ठेवील स्वत:च्या दवाखान्यांत.’’ आपण बाळाला जगवू, वाढवू शकू या कल्पनेने नयन सुखावते. नयनचा भाऊ सिंधूताईंना सांगतो, की आम्ही हे मूल जन्माला येऊ देणार नाही. सिंधूताईंना ते सहन होत नाही. ‘‘माझ्या प्रसादला तुम्ही पुन्हा एकदा मारणार..’’ ती थरथरू लागते. मग दीनवाणेपणाने उठून जाऊ लागते; पण आता ती एकटी नसते. नयन तिला आधार देते आणि तिच्याबरोबर आपल्या घरी परत जाते.

नाटकाचा हा शेवट कदाचित तडजोडीचा सुखान्त वाटण्याची शक्यता होती; पण यात तडजोड नसून दोन स्त्रियांनी एकमेकींना समजून आधार देणे होते. शिवाय तो सुखान्त तरी कसला? बाळाला वाढवत, संसारसुखाशिवाय, सबंध आयुष्य सासूबरोबर घालवणे यात नयनला कसले सुख होते. याउलट गर्भपात करून, पुनर्विवाह करणे यातच खरे तर तिला सुख होते. प्रत्यक्ष आयुष्यात ते तसेच झाले; परंतु नाटकातील प्रमुख व्यक्तिरेखा सिंधूताई हिला मात्र ते न्याय देणारे झाले नसते. अनेक आघात सहन करून, आयुष्यापुढे पुरते नमते घेऊनही, तिला प्रसादच्या मुलाला वाढवण्याइतकेही सुख मिळू नये, हे मला कठोरपणाचे वाटले.

सिंधूताईंची व्यक्तिरेखा, विशेषत: तिचे नाटकाच्या अखेरीस डॉ. भागवतांच्या मदतीने, आयुष्याकडे अधिक प्रगल्भतेने पाहू लागणे, यामुळे प्रेक्षकांना आपलीशी वाटली. सासू-सुनेच्या पारंपरिक संघर्षांपेक्षा या नाटकातील मूलभूत संघर्ष किती तरी वेगळा ठरला.

चार लेखकांच्या आठ-दहा प्रायोगिक नाटकांनाच संपूर्ण मराठी रंगभूमी समजून चांगल्या नाटकांकडे, ती व्यावसायिक आहेत म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या एका विशिष्ट वर्गाचा अपवाद सोडता, प्रेक्षकांनी या नाटकाला योग्य तो प्रतिसाद मोठय़ा प्रमाणावर दिला.

एन.सी.पी.ए.साठी माझे ‘लोककथा ७८’ हे नाटक ऑडिओ रेकॉर्डच्या स्वरूपात जतन केले जाणार होते, तेव्हा मी त्यांना विनंती केली की, ‘‘माझे ‘माझं काय चुकलं?’ हे नाटकही रेकॉर्ड करून ठेवा; कारण ते एक महत्त्वाचं नाटक आहे; एवढंच नाही तर त्यातील भाषेचा ब्राह्मणी लहेजा हा ‘लोककथा ‘७८’मधील भाषेपेक्षा अगदीच वेगळा आणि तितकाच वेधक आहे. विशेषत: सिंधूताई या पोक्त ब्राह्मणी स्त्रीचे संवाद!’’ त्यांनी माझी विनंती मानली आणि संपूर्ण नाटक माझ्या आवाजाने रेकॉर्ड केले.

सिंधूताईंची भूमिका करणारी भावना मूळची कारवारी असल्यामुळे तिला हे ब्राह्मणी संवाद जरा अवघड होते; पण दिग्दर्शक अरविंद देशपांडे याने ते तिच्याकडून ठाकठीक बसवून घेतले. चित्रपटात सिंधूताई साकारणाऱ्या रीमाला भाषेची अडचण मुळीच नव्हती. फक्त ती पुरेशी वयस्कर दिसत नव्हती. तरीही या दोन दर्जेदार अभिनेत्रींनी आपापल्या अडचणींवर मात करून ‘सिंधूताई’ ही व्यक्तिरेखा जीव तोडून सादर केली!

रत्नाकर मतकरी

pratibha.matkari@gmail.com

chaturang@expressindia.com