मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चार अल्पवयीनसह पाच मुलींचे कथितरित्या लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपी ६८ वर्षीय वरिष्ठ पत्रकार प्यारे मियांला एसआयटीने सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी प्यारे मियांची कोठडी पाच दिवसांसाठी वाढवली आहे. एसाआयटी प्यारे मियांशी निगडीत सर्व माहिती शोधण्यात लागली आहे.
४० पेक्षा जास्त मुलींवर बलात्कार –
आतापर्यंत हे उघड झाले आहे की प्यारे मियां गरीब घरच्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून, त्यांच्या संगोपनाच्या नावाखाली त्या कमी वयात असतानाच त्यांना आपल्याकडे घेऊन येत होता. या दरम्यान या अल्पवीयन मुलींचे तो लैंगिक शोषण करत होता. हे देखील सांगितले जात आहे की, या मुली वयात आल्यानंतर स्वतःच्या मर्जीनुसारच तो या मुलींची लग्न लावून देत होता. या गरीब घराच्या मुलींच्या कुटुंबीयांना तो पैसा व ताकदीच्या बळावर धमकावत होता. प्यारे मियां विरोधात अनेक मुलींनी तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांच्या मते प्यारे मियां एक दशकापासून मुलींचे लैंगिक शोषण करत आला आहे व त्याने जवळपास ४० मुलींवर बलात्कार केला आहे.
स्वतःला म्हणवत होता ‘अब्बू’ –
या पीडीत मुलींनी पोलिसांना सांगितले की, प्यारे मियां नावाच्या एका व्यक्तीने त्यांना १० हजार रुपये वेतन देण्याचे आमिष दाखवून, स्वतःबरोबर घेऊन आला होता. मुलींच्या सांगण्यानुसार प्यारे मियां हा गरीब घरच्या मुलींनाच आपल्या जाळ्यात ओढत असे, तो या मुलींना त्याला ‘अब्बू’ म्हणण्यास सांगत असल्याचेही मुलींनी सांगितले. त्याने अनेकदा आमचे लैंगिक शोषण केले, एवढेच नाहीतर या संतापजनक कृत्यासाठी तो त्याच्या सहकाऱ्यांना देखील बोलावत असल्याचीही मुलींनी तक्रार केली आहे.
रग्गड संपत्ती उघड –
काही माध्यमांच्या रिपोर्टसनुसार प्यारे मियांने भोपाळ व इंदुरमध्ये ४० पेक्षा जास्त ठिकाणी संपत्ती खरेदी केली आहे. भोपाळमधील एका दैनिकाचा मालक असलेल्या प्यारे मियांच्या चौकशीदरम्यान एसाआय़टीला ४० पेक्षा जास्त ठिकाणच्या संपत्तीचे कागदपत्र मिळाले आहेत. यामुळे अवैध संपत्ती खरेदी-विक्री व्यवहारात देखील तो होता, अशी शक्यता आहे. एवढेच नाहीतर त्याचे दोन मंगलकार्यालयं व एक अवैधरित्या उभारण्यात आलेली रहिवासी इमारत या अगोदरच पाडण्यात आलेले आहे. याशिवाय प्यारे मियांकडून भोपाळ व इंदुरमधील अनेक घरांसह जमिनीची कागदपत्रं देखील जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी प्यारे मियांच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांनी चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित वस्तू व महागड्या दारूच्या बाटल्या घरातून जप्त केल्या होत्या. असे देखील सांगितले जात आहे की, प्यारे मियां बऱ्याचदा परदेशात जात असत, यावेळी तो स्वतःबरोहबर अल्पवयीन मुलीस देखील घेऊन जात होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 11:55 am