डेमोक्रॅटिक-नियंत्रित प्रतिनिधीगृहात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध दुसर्‍या महाभियोगावरील चर्चेनंतर महाभियोग प्रस्ताव पारित करण्यात आला.  महाभियोगाचा प्रस्ताव १९७  च्या विरोधात २३२  मतांनी संमत झाला. १० रिपब्लिकन खासदारांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. आता हा प्रस्ताव १९ जानेवारीला सिनेटमध्ये आणला जाईल. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षांवर दोनदा महाभियोग प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले. याबाबतचा ठराव २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर झाला होता.

आणखी वाचा- महाभियोगाची कारवाई सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले…

“आम्हाला माहिती आहे की अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी देशाविरूद्ध सशस्त्र बंडखोरी करण्यासाठी चिथावणी दिली. त्यामुळे त्यांनी आपले पद सोडले पाहिजे. ते देशासाठी धोकादायक आहेत”, असे महाभियोगावरील चर्चेदरम्यान प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी म्हणाल्या.

आणखी वाचा- ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाबाबत रिपब्लिकन पक्षात मतभेद

दरम्यान, ट्रम्प यांच्या विविध सोशल मीडिया अकाऊंट वर बंदी घातल्यानंतर देशाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यापूर्वी कधीही अशा प्रकारे धोक्यात आले नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.