News Flash

‘हिंदुत्व’ शब्दाचा दुरुपयोग करणाऱ्यांना बिहार निवडणुकीत चपराक!

पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांचे मत; काश्मिरी युवक कट्टरतेकडे वळणार नसल्याची ग्वाही

पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती.

पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांचे मत;  काश्मिरी युवक कट्टरतेकडे वळणार नसल्याची ग्वाही

‘हिंदुत्व’ शब्दाचा दुरुपयोग करून त्याची तुलना ‘राष्ट्रवादाशी’ करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचे मोठे काम बिहारच्या निवडणुकांनी केले आहे, असे परखड भाष्य काश्मिरातील पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी केले. काश्मीरमध्ये सुफीवादाची संस्कृती असल्याने येथील तरुण कट्टरतेकडे वळणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सहिष्णुता ही आपल्या देशाची ताकद असून, आपण या कथित उपद्रवी तत्त्वांना आळा घातला नाही तर सीरिया, अफगाणिस्तान व इराकमध्ये इस्लामच्या नावावर जे काय सुरू आहे तसे आपल्या देशात होऊ लागेल. भारतातील काही परिघाबाहेरील लोक हिंदुत्वाच्या नावाचा दुरुपयोग करत असून ते त्याची तुलना राष्ट्रवादाशी करतात, हे आणखी वाईट आहे, असे मेहबूबा यांनी हिंदुस्तान टाइम्सच्या ‘लीडरशिप समिट’मध्ये सांगितले.

हिंदुत्वाच्या नावावर काम करणारे उपद्रवी लोक हे इस्लामच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्या ‘आयसिस’प्रमाणेच असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपसोबत युतीचे सरकार चालवणाऱ्या पीडीपीच्या नेत्या असलेल्या मेहबूबा यांनी केली.

काही केंद्रीय मंत्र्यांसह बरेच लोक ‘पाकिस्तानला निघून जा’ असे म्हणतात, त्याचे तुमचा पक्ष कशा प्रकारे समर्थन करतो असा प्रश्न विचारला असता मुफ्ती म्हणाल्या की, ही मानसिकता तीच आहे. काश्मिरी युवक कट्टरवादाकडे वळत असल्याचा मुद्दा काळजी करण्यासारखा नसल्याचे सांगून मेहबूबा म्हणाल्या, की ‘काश्मिरियत’, म्हणजे काश्मीरचे सुफीवादाची संस्कृती हे सर्व गोष्टींचे उत्तर आहे. काश्मिरी लोक कुणाचे हुकूम स्वीकारत नाहीत.

काश्मीरमध्ये आयसिसचे झेंडे फडकावणाऱ्या काही युवकांना अटक करण्यात आली. मात्र हे सर्व काय आहे याची त्यांना कल्पना नव्हती. केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी असे केले होते. आयसिस ही संघटना इस्लामच्या मूळ तत्त्वांविरुद्ध असून, इस्लामला प्रिय असलेली प्रत्येक गोष्ट ते नष्ट करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2015 2:11 am

Web Title: bihar election give slap those people who miss use word hindutva
टॅग : Bihar Election
Next Stories
1 शेतकऱ्यांना आता भूआरोग्यपत्रे देणार
2 खटले मागे न घेतल्यास काँग्रेसचे आंदोलन
3 नितीशकुमार-गेट्स चर्चा
Just Now!
X