22 October 2019

News Flash

निवडणूक आयोगाआधी भाजपानेच जाहीर केली निवडणुकांची तारीख!

प्रकरण गंभीर असून याची चौकशी केली जाईल

देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन केली. पण निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरद्वारे निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 12 मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होईल असं ट्विट मालवीय यांनी केलं. विशेष म्हणजे मालवीय यांनी ट्विट केलं तोपर्यंत निवडणूक आयोगानेही तारीख जाहीर केली नव्हती. सोशल मीडियावर जोरदार टीका व्हायला सुरूवात झाल्यानंतर मालवीय यांनी आपलं ट्विट डिलीट केलं. निवडणुकीच्या तारखेची घोषणा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असतानाच सोशल मीडियावरून केल्यानं भाजपा संशयाच्या फेऱ्यात सापडला आहे.

सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी अमित मालवीय यांनी कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान होईल, तर 18 मे रोजी मतमोजणी होईल असं ट्विट केलं. त्यावेळी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होती. मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत निवडणुकांबाबतच बोलत होते. तोपर्यंत त्यांनी मतदानाची किंवा मतमोजणीची तारखेबाबत काहीही घोषणा केली नव्हती.

दरम्यान, पत्रकार परिषद सुरू असतानाच पत्रकारांनी निवडणूक आयोगाकडे मालवीयांनी केलेल्या ट्विबाबत विचारणा केली. तुम्ही अजून घोषणा केली नसताना भाजपा आयटी सेलच्या प्रमुखाने तारीख कशी सांगितली असं आयोगाला विचारण्यात आलं. त्यावर हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी केली जाईल तसंच कठोर कारवाई केली जाईल असं आयोगाने सांगितलं.

निवडणूक आयोगानं घोषणा करण्याआधी निवडणुकांची तारीख फुटलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयोगानं दिला.

 

 

First Published on March 27, 2018 12:39 pm

Web Title: bjps amit malviya tweets karnataka poll dates before announcement