उत्तराखंडमध्ये भाजप आमदाराच्या मारहाणीमुळे शक्तिमान या पोलिस दलातील घोडय़ाचा एक पाय कापावा लागला होता. काहींच्या मते आमदार गणेश जोशी यांनी त्याच्यावर काठी उगारल्याने तो मागे सरकत गेला व एका जाळी नसलेल्या खड्डय़ात त्याचा पाय अडकला, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. पण सध्या आयटीबीपी अकादमी शक्तिमानच्या वीस साथीदार घोडय़ाना विशेष कौशल्ये शिकवत आहे. या प्रशिक्षणात जर शक्तिमानचा समावेश असता तर कदाचित तो जायबंदी होण्यापासून वाचला असता.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तराखंडमध्ये पोलिस दलात घोडय़ांचा वापर केला जातो. राष्ट्रीय अश्व प्रशिक्षण शाळेत जानेवारीपासून २० घोडय़ांना ३० प्रशिक्षक शिकवत आहेत. भानू कँप येथे त्यांना डोंगराळ भागात प्रशिक्षण दिले जात असून इंडो-तिबेट दलाचे पोलिस या घोडय़ांना प्रशिक्षित करीत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शक्तिमानसारख्या घोडय़ांना आताची घटना घडण्याआधीच प्रशिक्षणासाठी पाठवत असल्याची माहिती उत्तराखंड सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली होती. या ताफ्यात अकबर, सुलतान, अल्टामस, नाझ, नवाब, नीलम, अंगुरी, राका, मंदाकिनी, डायना व ज्युली या घोडय़ांचा समावेश असून ते साधारण शक्तिमान इतक्याच म्हणजे १३ वर्षे वयोगटातील आहेत. शक्तिमानवर भाजप आमदार गणेश जोशी यांनी डेहराडून येथे निषेध मोर्चाच्या वेळी १४ मार्चला हल्ला केला होता. शक्तिमानसारख्या घोडय़ांना शारीरिक संरक्षक आवरण असायला हवे होते, शक्तिमानला ते नव्हते. आताची घटना या घोडय़ांना प्रशिक्षित करताना डोळ्यासमोर ठेवली जात आहे.
प्रत्येक वेळी घोडय़ाला मजबुती किंवा कुठल्याही परिस्थितीत राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते, पण आता त्यांना कौशल्ये शिकवली जाणार आहेत. घोडय़ांना समाधानी व सुखी कसे ठेवावे याचे प्रशिक्षण दिले जात असून घोडय़ाची देहबोली काय सांगते हेही शिकवले जात आहे. घोडयाच्या भूक, संताप, वेदना या संवेदना घोडय़ावर बसलेल्या व्यक्तीला समजल्या पाहिजेत. रॉयल माउंटेड पोलिस दलाकडून जी कौशल्ये शिकवली जातात ती या घोडयांना शिकवली जात आहेत. त्यामुळे ते गिरकी घेऊ शकतील तसेच एकापाठोपाठ एक व्यवस्थित चालू शकतील. आयटीबीपीचा एनइटीएस विभाग नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्ज अँड अ‍ॅनिमल ट्रान्सपोर्ट यांचा भाग आहे.