श्रीलंकेतील तामिळींच्या प्रश्नावरून निर्माण झालेले तीव्र मतभेद गाडून द्रमुक आणि काँग्रेसने शनिवारी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी करण्याचा निर्णय जाहीर केला.
ज्या पक्षावर विश्वास ठेवता येऊ शकतो अथवा विसंबून राहता येऊ शकते असा द्रमुक हा प्रादेशिक पक्ष असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले असून त्यांनीच दोन्ही पक्षांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब केले.
द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या निवासस्थानी आझाद यांनी चर्चा केली. काँग्रेस पक्ष श्रीलंकेतील तामिळ जनतेशी प्रतारणा करीत असल्याचा आरोप करून द्रमुकने तीन वर्षांपूर्वी काँग्रेसशी संबंध तोडले होते.
काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते आणि करुणानिधी व पक्षाचे अन्य नेते यांच्या पातळीवर चर्चा करून विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आझाद यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. आझाद यांनी या वेळी करुणानिधी यांची स्तुती केली आणि द्रमुक हा विश्वासार्ह पक्ष असल्याचे नमूद केले.
काँग्रेस आणि द्रमुकची आघाडी २०१३ मध्ये तुटली होती, आता २०१६ मध्ये दोन्ही पक्षांनी हातमिळवणी करण्यासारखा कोणता बदल झाला असे विचारले असता आझाद म्हणाले की, राजकीय अपरिहार्यता आणि दबाव ही त्याची कारणे आहेत. द्रमुकसमवेत आघाडी करण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही आम्ही एकमेकांचे मित्र होतो, राजकारणात काही वेळा अपरिहार्यता आणि दबाव असतो, असेही काँग्रेसचे नेते म्हणाले.
काँग्रेस आणि द्रमुक यांची प्रमुख आघाडी असेल आणि डीएमडीकेला आघाडीत सहभागी करून घ्यावयाचे की नाही हा निर्णय द्रमुक घेईल, विधानसभा निवडणुका द्रमुकच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहेत, असे आझाद म्हणाले.