काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीसाठी केंब्रिज अॅनालिटिकाची मदत घेतल्याचा आरोप भाजपाने केला असतानाच आता राहुल गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसने केंब्रिज अॅनालिटिकाची मदत घेतलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दूरसंचार परिवर्तनाचे प्रणेते आणि राहुल गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले, काँग्रेसने केंब्रिज अॅनालिटिकाची मदत घेतलेली नाही हे मी खात्रीने सांगतो. तसेच राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य करण्यासाठी ब्रिटनमधील डेटा कंपनीची मदत घेतलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधीजींच्या पक्षाला मी असे काम करुच देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी ५० वर्षांपासून टेलिकॉम आणि आयटी क्षेत्रात आहे. बिग डेटा, अॅनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्यूटींग याबाबत मला माहिती आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी पैशात उत्तम सेवा देऊ शकणाऱ्या डेटा अॅनालिटिक्स कंपन्या आहेत, मग दुसऱ्या देशातील कंपनीची मदत का घेतली जाईल, असा प्रश्न त्यांनी विचारला. भारतीय माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवली जात आहे. खळबळ निर्माण करणे आणि जनतेच्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर गैरप्रभाव टाकण्याचा प्रयत्न फेसबुकच्या माध्यमातून परदेशी विश्लेषक कंपन्यांनी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माहिती-तंत्रज्ञान आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी दिला होता. वृत्तपत्र स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि समाजमाध्यमांद्वारे मतस्वातंत्र्याचे आम्ही समर्थन करतो. मात्र त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन फेसबुकने आमच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकू नये, असे त्यांनी म्हटले होते.