काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी भाजपा खासदार नियम वाचून दाखवत राहुल गांधींना फक्त बजेटवर चर्चा करावी अशी मागणी करत असताना दुसरीकडे काँग्रेस सदस्यांनी मात्र शेती अर्थसंकल्पाचा भाग असल्याचं सांगत अडथळे न आणण्याचा सल्ला दिला. राहुल गांधींनी सभागृहात गोंधळातच आपलं भाषण पूर्ण केलं आणि शेवटी असं काही केलं ज्यावरुन पुन्हा एकदा गोंधळ झाला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे योग्य नसल्याचं सांगत खडसावलं.

“हा देश फक्त चार लोक चालवतात,” लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

झालं असं की, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान शेतकरी आंदोलनादरम्यान जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, ““मी फक्त शेतकरी आंदोलनावर बोलणार आहे. जे २०० शेतकरी शहीद झाले त्यांना यांनी श्रद्धांजली वाहिली नाही. माझ्या भाषणानंतर दोन मिनिटांचं मौन बाळगणार आहे. तुम्हीदेखील माझ्यासोबत उभं राहावं”. यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार आपापल्या जागेवर श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिले. यावर ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली तर भाजपा खासदारांनी शेम-शेम अशा घोषणा दिल्या.

ओम बिर्ला म्हणाले की, “मला हे सदन चालवण्याची जबाबदारी दिली आहे. तर असं काही असेल तर तुम्ही मला लेखी द्या मी त्यासंदर्भाने विचार करुन निर्णय घेईन. हे योग्य नाही”.

“कायदे लागू झाल्यानंतर देशातील शेतकरी, दुकानदार, छोटे व्यापारी यांचे व्यवसाय बंद होतील. फक्त दोन लोक देश चालवणार. अनेक वर्षांनी भारतातील लोक भूकबळीचे शिकार ठरतील. रोजगार मिळणार नाहीत. नोटबंदीपासून मोदींनी याची सुरुवात केली. गरीब, शेतकरी, मजुरांकडून पैसे घेऊन खिशात टाकण्याची योजना होती. नंतर जीएसटी…गब्बर सिंग टॅक्स आणला. नंतर पुन्हा तेच शेतकरी, व्यापारी, दुकानदारांवर आक्रमण केलं. करोना संकटात मजूर बसचं तिकीट मागत होते पण देण्यात आलं नाही” असं राहुल गांधी म्हणाले.

“आज आपला देश रोजगार निर्मिती करु शकत नाही. उद्याही रोजगार येणार नाहीत कारण सरकारने छोटे उद्योग, व्यापारी, मजूर, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. हे शेतकऱ्यांचं नाही तर देशाचं आंदोलन आहे. शेतकरी अंधारात बॅटरी दाखवत आहेत. देश हम दो हमारे दो विरोधात उठणार आहे,” असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

“शेतकरी, मजूर आणि छोट्या दुकानदारांना त्यांना त्यांच्या पैशांपासून दूर करु शकतील असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाल लिहून देऊ इच्छितो की शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. शेतकरी, छोटे दुकानदार तुम्हाला हटवणार आहेत. तुम्हाला कायदे मागे घ्यावेच लागतील,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.