“हा देश फक्त चार लोक चालवतात,” लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

“बाजार समित्या बंद करण्याचा डाव”

Rahul Gandhi

हा देश फक्त चार लोक चालवत असल्याचं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत भाषण केल्यानंतर आज राहुल गांधी लोकसभेत आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. बाजार समित्या बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. यावेळी भाजपा खासदारांनी मोठ्या प्रमाणात सभागृहात गदारोळ घातला.

“काही वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ घोषणा देण्यात आला होती. करोना ज्याप्रमाणे दुसऱ्या रुपात आला आहे तसंच ही घोषणा आली आहे. हा देश चार लोक चालवतात ‘हम दो और हमारे दो’,” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. नरेंद्र मोदी हेतूबद्दल बोलले होते, मात्र त्यांचा हेतू फक्त आपल्या मित्रांची मदत करणं आहे असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे तीन पर्याय आपण दिले आहेत असं उत्तरही त्यांनी नरेंद्र मोदींना दिलं.

“कायदे लागू झाल्यानंतर देशातील शेतकरी, दुकानदार, छोटे व्यापारी यांचे व्यवसाय बंद होतील. फक्त दोन लोक देश चालवणार. अनेक वर्षांनी भारतातील लोक भूकबळीचे शिकार ठरतील. रोजगार मिळणार नाहीत. नोटबंदीपासून मोदींनी याची सुरुवात केली. गरीब, शेतकरी, मजुरांकडून पैसे घेऊन खिशात टाकण्याची योजना होती. नंतर जीएसटी…गब्बर सिंग टॅक्स आणला. नंतर पुन्हा तेच शेतकरी, व्यापारी, दुकानदारांवर आक्रमण केलं. करोना संकटात मजूर बसचं तिकीट मागत होते पण देण्यात आलं नाही” असं राहुल गांधी म्हणाले.

“आज आपला देश रोजगार निर्मिती करु शकत नाही. उद्याही रोजगार येणार नाहीत कारण सरकारने छोटे उद्योग, व्यापारी, मजूर, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. हे शेतकऱ्यांचं नाही तर देशाचं आंदोलन आहे. शेतकरी अंधारात बॅटरी दाखवत आहेत. देश हम दो हमारे दो विरोधात उठणार आहे,” असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

“शेतकरी, मजूर आणि छोट्या दुकानदारांना त्यांना त्यांच्या पैशांपासून दूर करु शकतील असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाल लिहून देऊ इच्छितो की शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. शेतकरी, छोटे दुकानदार तुम्हाला हटवणार आहेत. तुम्हाला कायदे मागे घ्यावेच लागतील,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

“मी फक्त शेतकरी आंदोलनावर बोलणार आहे. जे २०० शेतकरी शहीद झाले त्यांना यांनी श्रद्धांजली वाहिली नाही. माझ्या भाषणानंतर दोन मिनिटांचं मौन बाळगणार आहे,” असं सांगत राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी शेतकऱ्यांना दोन मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहिली.

राहुल गांधींच्या भाषणावेळी सभागृहात मोठा गोंधळ झाला. काँग्रेस आणि भाजपाच्या खासदारांनी एकमेकांना नियम वाचून दाखवले. काँग्रेसच्या अधीरंजन चौधरी यांनी नियम वाचून दाखवत राहुल गांधी योग्य मुद्यावर बोलत असल्याचं सांगितलं. शेती हा बजेटमधील विषय असल्याने या विषयावर राहुल बोलत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे भाजपाच्या खासदारांनी जर तुम्ही ४० टक्के माल हा अदानी, अंबानींच्या गोदामांमध्ये जातो असं सांगत आहात तर त्यासंदर्भातील पुरावा द्या अशी मागणी केली. ही आकडेवारी येते कुठून याचा खुलासा करा अशी मागणीही भाजपाच्या खासदारांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress rahul gandhi loksabha pm narendra modi farm laws sgy

ताज्या बातम्या