एका आयुर्वेदिक डॉक्टरने आपल्याकडे करोनावरचं चमत्कारी औषध असल्याचा दावा केला आहे. आणि या त्याच्या दाव्याला भुलून लोकांनी त्याच्या दवाखान्याबाहेर लांबच लांब रांगाही लावल्या आहेत. आंध्रप्रदेशातल्या नेल्लोरमधल्या कृष्णपटनम या गावातली ही घटना आहे.

सध्या देश करोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. दिवसेंदिवस वाढणारी करोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही महाभाग लोकांना फसवत आहेत. असाच एक दावा या डॉक्टर महाशयांनीही केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून अनेकांनी या डॉक्टरच्या दवाखान्याबाहेर रांगा लावल्या आहेत. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या तीन प्रकारच्या रांगा आहेत- एक करोनाबाधितांची रांग आहे, दुसरी ताप आणि इतर लक्षणं असलेल्यांची रांग आहे, तर तिसरी रांग रोगप्रतिकारशक्ती वाढवू इच्छिणाऱ्यांची आहे.

हेही वाचा- डीआरडीओचं ‘अँटी कोविड २-डीजी’ औषध आलं; संरक्षण मंत्र्याच्या हस्ते अनावरण

या आयुर्वेदिक डॉक्टरचं नाव बोनिगी आनंद असल्याचं कळत आहे. टाईम्स नाउ या न्यूज पोर्टलने याबद्दल सविस्तर वृत्त दिले आहे. या डॉक्टरने असा दावा केला आहे की, त्याने चार औषधे तयार केली आहेत. या औषधांना तो चार अक्षरांनी ओळखते. पी- फुफ्फुसांच्या इन्फेक्शनसाठी, एफ- शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी, एल म्हणजे यकृताच्या आरोग्यासाठीचं औषध आणि के नावाचं औषध हे गंभीर रुग्णांसाठी आहे.

या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, या औषधांमध्ये मिरे, कापूर, मध, जिरे आणि दालचिनी या पदार्थांचा वापर कऱण्यात आला आहे. ह्या औषधाची तपासणी करण्यासाठी केव्हिएन चक्रधन बाबू यांनी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी, आयुष विभागाचे अधिकारी यांची एक टीम तैनात केली आहे. कृष्णपटनम इथले तपासणी अधिकारी खाजा वाली यांनी सांगितलं की, या डॉक्टरकडे एवढी गर्दी आहे, कारण याचं हे औषध उपयोगी ठरत आहे आणि आत्तापर्यंत तरी कोणतेही साईड इफेक्ट्स नोंदवण्यात आलेले नाहीत.