फेसबुक या समाजमाध्यमावरील लोकप्रियतेत पहिला क्रमांक दिल्याबाबत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुकचे आभार मानले आहेत. लोकप्रियतेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांचाही मोठा सन्मान झाला असल्याच्या भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्या आहेत.

विशेष म्हणजे ट्रम्प हे भारताला भेट देण्याच्या अगोदर फेसबुकने हे दोन नेते लोकप्रियतेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी त्यांच्या समाजमाध्यमावर ट्रम्प लोकप्रियतेत क्रमांक एकवर असल्याचे म्हटले होते. त्यावर ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले आहे,की हा मोठा सन्मान आहे. कारण झकरबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प क्रमांक १ वर, तर मोदी क्रमांक दोनवर असल्याचे म्हटले होते. फेसबुकवर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असल्याबाबत ट्रम्प यांनी दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

ट्रम्प यांनी शनिवारी ट्विटरवर म्हटले आहे,की मी दोन आठवडय़ात भारताच्या दौऱ्यावर जात आहे, त्या दौऱ्याकडे मी आशावादी दृष्टिकोनातून पाहत आहे.

भारत भेटीत ट्रम्प हे अहमदाबादला जाणार असून तेथे ते ‘केम छो ट्रम्प’ मेळाव्यात भाषण करणार आहेत. हा कार्यक्रम मोंटेरा येथील स्टेडियमवर होणार आहे.