ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’ असल्याची टीका तरुण गोगोई यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माच्या आधारे विभाजन करण्याचा मोहम्मद अली जिना यांचा ‘दोन देश सिद्धांत’ राबवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.

गोगोई यांनी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला. त्यांनी म्हटलं आहे की, “पंतप्रधान आरोपी करतात की आम्ही काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतो. पण त्यांनी आपला स्तर शेजारी राष्ट्रांपेक्षाही खाली आणला आहे. नरेंद्र मोदी जिना यांच्या दोन देश सिद्धांताच्या दिशेने वाटचाल करत असून भारताचे हिंदू जिना म्हणून उदयाला येत आहेत”.

“आम्ही हिंदू आहोत, पण देश हिंदू राष्ट्र होताना पाहण्याची इच्छा नाही”
त्यांनी म्हटलं आहे की, “ज्याप्रकारे सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरुन देशभरात आंदोलन सुरु आहे, त्यावरुन लोकांनी भाजपा आणि त्यांच्या संघटनांची हिंदुत्त्व विचारसरणी नाकारली असल्याचं सिद्ध होत आहे. आम्ही हिंदू आहोत पण आपला देश हिंदू राष्ट्र होताना पाहण्याची इच्छा नाही. विरोध करणाऱ्यांमध्ये जास्त संख्या हिंदूंची आहे. जे भाजपा आणि आरएसएसच्या हिंदुत्त्वाविरोधात आहेत”.

तरुण गोगोई तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत. गोगाई एनआरसी आणि सीएएवरुन केंद्र सरकारवर सतत निशाणा साधत आहेत. याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात एकही डिटेंशन सेंटर नसल्याच्या दावा करण्यावरुन टार्गेट केलं होतं. गोगोई यांनी नरेंद्र मोदी खोटं बोलत असून भाजपा सरकारने आसाममध्ये डिटेंशन सेंटर उभारण्यासाठी २०१८ मध्ये ४६ कोटींचा निधी जारी करण्याचा आल्याचा दावा केला आहे.