मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपा देशभरात उत्सव साजरा करणार आहे. त्यासाठी २६ मेपासून ११ जूनपर्यंत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.

शाह म्हणाले, भाजपाने १६,८५० गावांना समस्यामुक्त केले आहे. आजवर अंधारात असलेल्या या गावांमध्ये आमच्या पक्षाने वीज पोहोचवण्याचे काम केले. यापुढे देखील सर्व गावांच्या समस्या आम्ही दूर करणार आहोत.

सरकारच्यावतीने १४ एप्रिल ते ५ मेपर्यंत ‘ग्राम स्वराज अभियान’ हे विशेष अभियान राबवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारनेच पहिल्यांदा १६,८५० गावांना समस्यामुक्त करण्यासाठी काम केले. आजवर हे काम कोणत्याही सरकारने केले नाही. याद्वारे आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली, असेही शाह यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक घरात वीज, गॅस सिलेंडर पोहोचले. प्रत्येक घरामध्ये लोकांना वीमा सुरक्षा मिळाली. त्याचबरोबर उजाला योजनेद्वारे LED बल्ब देखील वितरित करण्यात आले. २०.५३ लाखांपेक्षा अधिक कुटुंबांनी जनधन योजनेंतर्गत बँक खाती खोलली, हे सर्व मोदी सरकारची देणं असल्याचे यावेळी अमित शाह म्हणाले.