कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत करण्यास केंद्र सरकारने स्पष्टपणे नकार दिला. येत्या आठवड्याभरात कांद्याचे दर खाली उतरतील, अशीही अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केलीये. गेल्या काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या शहरांतील किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत कांद्याचे दर पोहोचले आहेत. आधीच महागाईचे चटके सहन करीत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला कांद्याचे भाव तेजीत असल्यामुळे आणखी फटका बसतो आहे.
कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करण्याची मागणी होती. मात्र, सरकारने त्याला नकार दिला. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री मनिष तिवारी म्हणाले, कांद्याच्या दरामध्ये झालेली वाढ तात्पुरती आहे. येत्या आठवड्याभरात हे दर खाली उतरतील, अशी अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री के. व्ही. थॉमस यांनीही कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत करण्याला गुरुवारी नकार दिला होता.