देशातील रस्तेबांधणीला आलेली मरगळ झटकून टाकण्याचा निर्धार केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केला असून येत्या दोन वर्षांत रस्तेबांधणीचा वेग प्रतिदिन ३० किमी करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. सध्या देशातील रस्तेबांधणी अतिशय मंदावली आहे. भूसंपादन, पर्यावरण व वनखात्याची परवानगी आदी मुद्दय़ांमुळे देशभरात सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प रखडले आहेत. मात्र या प्रकल्पांना तातडीने मंजुऱ्या दिल्या जातील आणि येत्या ३ महिन्यांत हे रखडलेले प्रकल्प सुरू होऊन धावू लागतील, असा विश्वास गडकरी यांनी येथे बोलून दाखवला.
देशातील रस्तेबांधणीचा वेग सध्या प्रतिदिन अवघा ३ किमी आहे, मात्र दोन वर्षांनंतर तो ३० किमीवर जाईल, असे गडकरी म्हणाले. मागील सरकारने २००९ मध्ये प्रतिदिन २० किमीचे लक्ष्य ठेवले होते, परंतु विविध मंजुऱ्या मिळण्यातील अडचणींमुळे हे उद्दिष्ट निम्म्यानेही गाठले गेले नाही, असे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 12:43 pm