विवाहबाह्य़ संबंध हे घटस्फोटाचे कारण असू शकते पण ती गुन्हेगारी कृती नसून अनैतिक कृती आहे, असे मत दिल्ली न्यायालयाने व्यक्त केले आहे.
एका व्यक्तीच्या पत्नीने पतीच्या विवाहबाह्य़ संबंधांमुळे आत्महत्या केली होती. त्यासाठी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्य़ाखाली दोषी ठरवण्यास न्यायालयाने नकार दिला.
सदर व्यक्तीचे विवाहबाह्य़ संबंध हे तो त्याच्या पत्नीशी एकनिष्ठ नव्हता हे दाखवतात व तो विश्वासघात आहे, अनैतिक कृत्य आहे पण तो शिक्षापात्र गुन्हा नाही, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनोज जैन यांनी सांगितले. न्यायालयाने सदर व्यक्तीला आरोपमुक्त करताना म्हटले आहे की, विवाहबाह्य़ संबंधांचा आरोपही पूर्णपणे सिद्ध झालेला नाही, त्याने तिला आत्महत्येला प्रवृत्त केले असा त्याचा अर्थ होत नाही. फिर्यादी पक्षाच्या मते या महिलेने पतीच्या विवाहबाह्य़ संबंधातून २०११ मध्ये आत्महत्या केली व त्याबाबत तिच्या भावाने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बहिणीला तिचा पती मारत होता असे म्हटले होते. न्यायालयाच्या मते त्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आणखी पुरावे सादर करता आलेले नाहीत, विवाहबाह्य़ संबंध हे बेकायदा आहेत, अनैतिक आहेत पण आरोपीने पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले असे दर्शवणारे पुरावे नाहीत.