महिलांना सन्मानाचे जगणे लाभावे तसेच त्यांच्या समान अधिकारांचे संरक्षण व्हावे यासाठी तिहेरी तलाक, निकाल हलाला या अनिष्ट प्रथा जायलाच हव्यात, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. संसदेत दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला अभिभाषणाद्वारे संबोधित करताना ते बोलत होते.

राष्ट्रपती म्हणाले, देशातील प्रत्येक बहिणीच्या, मुलीच्या समान अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी तिहेरी तलाक, निकाह हलाला यांसारख्या अनिष्ठ प्रथा संपायलाच हव्यात. आपल्या बहिणींना आणि मुलींना जीवनात सन्मानाने आणि चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी होणाऱ्या कायद्यासाठी सर्व सदस्यांनी योगदान द्यावे असे आवाहन मी त्यांना करतो.


भाजपाने आपल्या जाहीरनाम्यान तिहेरी तलाक संदर्भातील कायदा आणण्याचे आश्वास दिले होते. यापूर्वी तिहेरी तलाक बेकायदा असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात कायदा करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार, सरकारने संसदेत दोनदा विधेयकही सादर केले होते. मात्र, यातील काही जाचक तरतुदींवर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने हे विधेयक राज्यसभेत मंजुर होऊ शकले नाही. मात्र, त्यानंतर सरकारने यासंदर्भात अध्यादेशही आणला होता.

तत्काळ तिहेरी तलाक ही मुस्लिम समाजातील एक जुनी प्रथा आहे. यामध्ये मुस्लिम पतीला तोंडाने तीनदा तलाक असे म्हणून तत्काळ आपल्या पत्नीला विवाह बंधनातून मुक्त करता येते. याला अनेक मुस्लीम तज्ज्ञांनी इस्लामविरोधी म्हटले आहे. मात्र, तरीही ही प्रथा समाजात अस्तित्वात आहे.

तसेच निकाह हलाला ही आणखी एक मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा असून यामध्ये पतीने पत्नीला घटस्फोट दिला असेल व त्या दोघांना पुन्हा विवाह करायचा असेल तर त्याआधी त्या महिलेला दुसऱ्या पुरूषाशी विवाह करायला लागतो. त्याच्याबरोबर पत्नी म्हणून रहावं लागतं, त्यानंतर त्याच्याशी घटस्फोट घ्यायला लागतो आणि नंतरच ती पुन्हा पहिल्या पतीशी विवाह करू शकते.