जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काश्मीरच्या परिस्थितीबाबत रोज विविध बातम्या येत आहेत. सरकारकडून दावा केला जात आहे की या ठिकाणचे निर्बंध हळूहळू शिथील केले जात आहेत. तर याच पार्श्वभूमीवर श्रीनगरचे महापौर जुनैद आजिम मट्टू यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काश्मीरच्या रस्त्यांवर मृतदेह दिसत नाहीत याचा अर्थ असा नाही की येथे सर्व काही ठीक आहे. येथील परिस्थिती सर्वसामान्य होईल अशी अपेक्षा बाळगणे देखील अवास्तविक गोष्ट आहे. राजकीय नेत्यांना ताब्यात घेतले जाण्याचे भाजपा सरकारचे धोरण हे पुर्णपणे त्यांच्या विशेष मोहिमेचाच भाग आहे.

शिवाय त्यांनी यावेळी राज्यातील नेत्यांना नजरकैदेत व ताब्यात ठेवण्यात आल्यावरूनही टीका केली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार जम्मू व श्रीनगरच्या महापौरांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे.

महापौर जुनैद मट्टू यांनी हे देखील म्हटले की, अद्यापही असे अनेक परिवार आहेत जे आपल्या परिवारीत अन्य सदस्यांची बोलू शकत नाहीत. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे त्यांच्या अस्तित्वावरच संकट आले आहे. आम्ही सदैव हिंसाचाराच्या धोक्याबरोबर जगत आहोत. हे काही नवी परिस्थिती नाही. महापौर जुनैद हे सज्जाद लोन यांच्या जम्मू – काश्मीर पीपल कॉन्‍फरेन्‍स पार्टीचे प्रवक्ते आहेत. जम्मू-काश्मीर संबंधी निर्णयानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांमध्ये सज्जाद लोन यांचाही समावेश आहे.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिबंध घालणे योग्य असल्याचे म्हटले होते. मागील आठवड्यात त्यांनी म्हटले होते की, दहशतवाद्यांना रोखण्यासाठी अशाप्रकारच्या उपाययोजना करणे गरजेचे होते.