04 July 2020

News Flash

मराठी जगत: इंदूर महाराष्ट्र साहित्य सभेचा शारदोत्सव उत्साहात साजरा

महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरने यंदा आपला ५५वा शारदोत्सव साजरा केला. महाराष्ट्र भूषण इतिहास संशोधक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या अभूतपूर्व सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या

| March 31, 2013 03:59 am

महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरने यंदा आपला ५५वा शारदोत्सव साजरा केला. महाराष्ट्र भूषण इतिहास संशोधक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या अभूतपूर्व सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या शारदोत्सवांतर्गत बाल व किशोरवयीन मुलामुलींकरिता रांगोळी, सुगम संगीत, चित्रकला, महापुरुष वेशभूषा, मराठी पाठांतर इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शंभराहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धामध्ये भाग घेतला. तरुण व वयस्क मंडळीकरिता काव्यलेखन, लघुकथा लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. माळवा प्रांतातल्या सृजनशील लेखकांच्या प्रकाशित पुस्तकांना शारदोत्सवप्रसंगी ‘सरवटे साहित्य पुरस्कार’ देण्यात येतो. या वर्षी डॉ. सुलभा पागेकेकरे यांच्या ‘माणूस’ या कथासंग्रहाला हा पुरस्कार देण्यात आला.
याचप्रसंगी चारदिवसीय व्याख्यानमालासुद्धा आयोजित करण्यात आली होती. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’, अमृतानुभव, एक कैलास लेणे, आणि पसायदान’ या विषयांवर डॉ. यशवंत पाठक, पुणे यांच्या तिन्ही सारगर्भित व्याख्यानांचे श्रवण करून श्रोतृवर्ग खूपच सुखावला. ‘विवेकानंदांच्या विचारांची प्रासंगिकता-’ या विषयावर चौथे दिवशी संजय जोशी यांनी आपले विचार मांडले.
शारदोत्सवाचे उद्घाटन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्याच वेळी इंदूरस्थ चार गुणिजनांचा सत्कारही बाबासाहेबांच्या हस्ते करण्यात आला. गुणिजन श्री जगतकिशोर ठोंबरे, पंडित विजय अयाचित, बाळकृष्ण प्रधान आणि लेफ्ट. कर्नल मनोहर आठल्ये यांना शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन त्यांनी केलेल्या समाजसेवेची माहिती देण्यात आली. विविध स्पर्धातील पुरस्कृत स्पर्धकांनाही बाबासाहेबांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. याच वेळी ‘मालविका’ या स्मरणिकेचे लोकार्पणही करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी शिक्षण, क्रीडा, साहित्य व इतर विविध क्षेत्रांत प्रांतीय व राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या २०हून अधिक प्रतिभावंतांचा सत्कार बाबासाहेबांच्या हस्ते करण्यात आला. सायंकाळी ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर या जातीने हजर होत्या. सिनेमाच्या क्षेत्रात त्यांना आलेले अनेक अनुभव व प्रसंग त्यांनी कथन केले. सुमन सुगंधे या त्यांच्या वाद्य व गायकवृंदाने सुमनताईंनी सिनेमाकरिता गायलेली गाणी सादर केली. या बहारदार प्रस्तुतीचे सूत्रसंचालन श्रीमती मंगला खाडिलकर यांनी केले.
तिसऱ्या दिवशी सकाळी शारदोत्सवाच्या समारोहाच्या वेळी भाषणात बाबासाहेबांनी शारदोत्सवाचे सचिव मृगेन गदेवाडीकर, कार्याध्यक्ष विरल वडनेरे व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. सायंकाळी इंदूरस्थ शंभरहून अधिक कलाकारांनी नाटय़तपस्वी राजन देशमुख यांच्या संकल्पनेनुसार आयोजित केलेला व त्यांनीच दिग्दर्शित केलेला ‘शान- मराठी शान’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे यांत भूपाळी ते भैरवी, भारूड, पोवाडा, गोंधळ, लावणी, नाटय़ नृत्य या सर्व प्रकारच्या कलांचा समावेश होता. यातील कलाकार व्यावसायिक नसूनही त्यांनी सतत तीन तास श्रोत्यांना खिळवून ठेवले.
इतिहास, अध्यात्म, संगीत अन् राजनीती अशा विविध क्षेत्रांतील मातब्बर धुरीणांचा सहवास या शारदोत्सवप्रसंगी इंदूरस्थ जनतेस लाभला हे विशेष.

हैदराबादेत जागतिक मराठी दिन साजरा
(प्रा. माईनकर)
हैदराबाद येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने, येथील काशिनाथराव वैद्य सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटात शहीद झालेल्यांना मूक श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास प्रारंभ झाला. ग्रंथालयाचे अध्यक्ष दिगंबरराव खळदकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अर्चना आचलेरकर यांनी सरस्वती स्तवन आणि ‘माझी मराठी असे मायभाषा’ सादर केले. कार्यवाह सतीश देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.
मराठवाडय़ातील ज्येष्ठ साहित्यिक स्व. बी. रघुनाथ यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा परिचय प्रा. मीना देशपांडे जागीरदार यांनी केला. वृंदा जहागीरदार यांनी ‘नवे वर्ष’ आणि सतीश देशपांडे यांनी ‘सांज’ अशा रघुनाथांच्या दोन कविता सादर केल्या. डॉ. कांचन जतकर यांनी कथाकार बी. रघुनाथांच्या ‘नाल’ या कथेचे वाचन केले आणि कथेतील टांगेवाला रामजी आणि त्याचा घोडा ‘बन्सी’ यांच्यातील भावबंध नेमकेपणे प्रेक्षकांसमोर उभे केले.
प्रा. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ या पहिल्या कादंबरीस यंदा पन्नास वर्षे होत आहेत, त्या निमित्ताने त्या कादंबरीतील निवडक प्रसंगांचे अभिवाचन राजू साळुंखे यांनी आपल्या अनोख्या शैलीत सादर करून, कोसलाची श्रोत्यांना नव्याने ओळख करून दिली. स्व. रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ कादंबरीस २०१२ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली. माधव चौसाळकर, प्रणव घारीपुरीकर, कीर्ती जोशी, वृंदा जहागीरदार, योगिनी फळणीकर, डॉ. नयना जोशी आणि प्रकाश फडणीस यांनी ‘स्वामी’तील निवडक प्रसंगांचे अभिवाचन केले. कार्यक्रमास पाश्र्वसंगीत सुधिंद्र नेने व प्रकाश योजना सुहास बर्वे यांची होती. कार्यक्रमाची संकल्पना सतीश देशपांडे यांची, तर दिग्दर्शन प्रकाश फडणीस यांचे होते. कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकारांचा अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यवाह सतीश देशपांडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ. गणेश मतकर
जन्मस्मृती दिन
(सुनील गणेश मतकर)
इंदूरमध्ये बालनाटय़ाची परंपरा सुरू करणारे, होळकर राज्याचे इतिहासकार डॉ. गणेश मतकर यांचा जन्मस्मृती दिवस त्यांनीच स्थापन केलेल्या श्री अहिल्या नाटय़ मंडळाच्या कलावंतांनी साजरा केला. याप्रसंगी सुप्रसिद्ध सिनेकलावंत अच्युत पोतदारप्रणीत गुरुवर्य विश्वास मोरे सन्मान, तबलापटू राजेश चांदोलीकर, गायिका माधवी चांदोलीकर व नृत्यांगना मंजूषा जौहरी यांना देण्यात आला. याप्रसंगी कवी गोविंद काळे यांनी ‘धरणगाणी’ कविता पाठचा बहारदार कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष रानडे (संपादक- मी मराठी), मुख्य अतिथी परशुराम घुणे व डॉ. योगेंद्रनाथ शुक्ला होते. कार्यक्रमात गुरुवर्य विश्वास मोरे यांच्यासोबत अहिल्या नाटय़ मंडळाचे कलावंत व डॉ. मतकर यांचे स्नेही चाहते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अतिथी परिचय रुपाली दुबे, रुही नाईक व गजानंद खोडे यांनी केला. संचालन किशोर पूरकर यांनी, आभार प्रदर्शन देवेंद्र खेरीकर यांनी केले.

सी. के. पी. सीनियर सिटिझन्स
मंडळाचा उपक्रम
(माधवी प्रवीण प्रधान)
सी. के. पी. सीनियर सिटिझन्स मंडळ बडोदे यांनी अलीकडेच बाबुराव मोरे यांचे ‘वातविकार’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. वायू व हवामान यामुळे शरीरात कसे बदल होतात. शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी वायू निर्माण झाल्याने कार्य परिणाम होतात, गुडघ्यावरील उपाय इ.विषयी अत्यंत उपयुक्त माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर वेळोवेळी श्रोत्यांकडून विचारणा होत असलेल्या प्रत्येक प्रश्नालाही त्यांनी समर्पक तसेच समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमानंतर नियमाप्रमाणे या महिन्यांतील वैयक्तिक व लग्नांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. नाश्त्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
– रेखा गणेश दिघे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 3:59 am

Web Title: maharashtra sahitya sabha indore celebrates 55th year this time
Next Stories
1 संसद हल्ला: हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी शौर्यपदके स्वीकारली
2 ‘सौदी’च्या कामगार धोरणामुळे अस्वस्थता नको’
3 दहशतवाद्यांना ‘बोट’ विकणाऱ्यांवर समन्स बजावले
Just Now!
X