केरळमध्ये माओवाद्यांनी सोमवारी सकाळी केएफसी रेस्टॉरंट आणि वनविभागाच्या दोन कार्यालयांवर हल्ला केला. माओवाद्यांनी वनविभागाच्या कार्यालयाची मोठी तोडफोड केली. त्याचबरोबर माओवादी विचारांची समर्थन करणारी कागदपत्रे या ठिकाणी भिरकावण्यात आली. या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पलक्कडमधील वनविभागाच्या कार्यालयांवर पहाटेच्या सुमारास माओवाद्यांनी हल्ला केला. कार्यालयाच्या आवारात असलेल्या जीपचीही त्यांनी तोडफोड केली. इमारतीच्या सर्व बाजूंना माओवाद्यांचे समर्थन करणारे पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरमधील मजकुरामध्ये शस्त्रे घेऊन लढाईत सहभागी होण्याचे आवाहन सर्वसामान्यांना करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी कार्यालयातील संगणकही फोडले.
वायनाडमध्ये वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तेथील कार्यालयाच्या काचा माओवाद्यांनी फोडल्या. गेल्या काही दिवसांमध्ये या भागात सातत्याने माओवाद्यांकडून हल्ले करण्यात येत आहेत. मात्र, पोलीसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.