खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांविरोधात सुरु असल्याची टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. साध्वींनी काल आपण शौचालयं स्वच्छ करण्यासाठी खासदार झालो नसल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरुन आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून टीकाही होत आहे.

ओवेसी यांनी साध्वींवर टीका करताना म्हटले की, त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले असून त्यांच्या धोरणांविरोधात बोलत आहेत. त्याचबरोबर त्या कथीत सवर्ण समाजातील असल्याने त्यांनी टॉयलेट्स स्वच्छ करण्यास नकार दिला आहे, असे असेल तर देश न्यू इंडिया कसा होईल असेही त्यांनी साध्वींवर टीका करताना म्हटले आहे.

‘साध्वींच्या तिरस्कारयुक्त वक्तव्याचे मला आश्चर्य वाटत नाही कारण किंवा मला धक्काही बसलेला नाही. त्यांनी असे विधान केले कारण ते अशाच प्रकारचा विचार करतात. यावरुन खासदार साध्वींचा देशातील जातीव्यवस्था आणि भेदभावावर विश्वास असल्याचे स्पष्ट होते’, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत रविवारी संबोधित करताना भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही शौचालयं आणि गटारं साफ करण्यासाठी खासदार म्हणून निवडून आलेलो नाही आम्हाला ज्या कामासाठी निवडून दिलं गेलं आहे ते काम आम्ही इमानदारीत करु. मात्र, त्यांची ही बोलण्याची पद्धत अनेकांना खटकली आहे. या वक्तव्यासंदर्भातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून साध्वी प्रज्ञा यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.