पाकिस्तानने प्रत्यक्ष ताबा रेषेवरील छावण्यांवर केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात पूँछ जिल्ह्य़ामध्ये एक नागरिक ठार तर इतर चार जण जखमी झाले. पाकिस्तानी सैन्याने १२० एमएमच्या उखळी बॉम्बचा मारा पूँछ जिल्ह्य़ात केरनी-सबझियान या भागात केला त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर घबराट पसरली.
संरक्षण प्रवक्तयाने सांगितले, की लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी तुकडय़ांनी तोफगोळे व रॉकेट ग्रेनेडचा मारा केला तसेच स्वयंचलित हत्यारांनी सीमेवर गोळीबार केला.
८२ एमएमचे तोफगोळे व रॉकेट ग्रेनेड यांच्यासह लहान शस्त्रास्त्रेही वापरण्यात आली तसेच नागरी भागात काही तोफगोळे पडले. अब्दुल हमीद याचा तोफगोळ्यांच्या माऱ्यात मृत्यू झाला. पूँछचे पोलिस अधीक्षक जे.एस. जोहर यांनी सांगितले, की जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. पाकिस्तानी तुकडय़ांनी सप्टेंबर महिन्यात नऊ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ९ सप्टेंबर रोजी महासंचालक पातळीवरील चर्चा होत आहे, त्याच्या अगोदर शस्त्रसंधीचे उल्लंघन पुन्हा एकदा झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीही वाढली असून तो प्रश्नही पाच दिवसांच्या या चर्चेत उपस्थित केला जाणार आहे. पाकिस्तानने गेल्या महिन्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते, त्यात दोन जवानांसह ११ जण मृत्युमुखी पडले होते तसेच ३० जण जखमी झाले होते. २००३ मध्ये शस्त्रसंधी करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने या वर्षी २५० वेळा तर ऑगस्टमध्ये ५७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.