पाकिस्तानात अलीकडे हिंदू मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि जबरदस्तीने त्यांचे मुस्लिम तरुणांसोबत लग्न लावण्याच्या घटना वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रविवारी अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं
हल्लेखोरांनी भर लग्नाच्या मांडवातून एका २४ वर्षीय हिंदू महिलेचे अपहरण केलं. महत्वाचं म्हणजे हा सर्व प्रकार स्थानिक पोलिसांच्या देखरेखीखाली घडला. सिंध प्रांतातील हाला शहरात ही धक्कादायक घटना घडली. हाला हे शहर कराचीपासून २१५ किलोमीटर अंतरावर आहे.

पाकिस्तानातील माध्यमांच्या वृत्तानुसार, अपहरणानंतर भारती बाईचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले व एका मुस्लिम तरुणासोबत लग्न लावण्यात आले. हाला शहरातील एका हिंदू तरुणाबरोबर भारतीचे लग्न होणार होते. विवाहमंडपात लग्नाचे विधी सुरु असताना, अज्ञात हल्लेखोर तिथे आले व त्यांनी भारतीचे अपहरण केले.

कुटुंबिय काय म्हणाले
“माझ्या मुलीचे लग्नाचे विधी सुरु असताना, शाहरुख गुल नावाचा अपहरणकर्ता साथीदारांसोबत तिथे आला. पोलीसही त्याच्यासोबत होते. त्यांनी भरदिवसा लग्नाच्या मांडवातून माझ्या मुलीचे अपहरण केले” असे भारतीचे वडिल किशोर दास यांनी सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर काही दिवसांनी भारतीने इस्लाम धर्म स्वीकारल्याची कागदपत्रे आणि शाहरुख गुल सोबत तिने लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

कागदपत्रांनुसार, भारतीने एक डिसेंबर २०१९ रोजी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यासाठीच तिचे आधी विवाह मंडपातून अपहरण करण्यात आले. धर्मांतर केल्याच्या प्रमाणपत्रावर भारतीचे नवीन नाव ‘बुशरा’ आहे. भारतीच्या राष्ट्रीय ओळखपत्रामध्ये हाला शहराचा कायमस्वरुपी पत्ता देण्यात आला आहे. सध्या ती कराचीच्या गुलशन इक्बाल भागामध्ये वास्तव्याला आहे.

शाहरुखने पोलिसांच्या देखरेखीखाली आमच्या मुलीचे अपहरण केले. त्यामुळे तिला पुन्हा आपल्याकडे आणून सोडावे अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे.