‘ऊर्जा संगम २०१५’ या परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे २७ मार्च रोजी उद्घाटन होईल.
देशातील इंधन व ऊर्जाविषयक परिस्थिती, भावी काळातील ऊर्जेची गरज आणि ती भागवण्यासाठीची उपाययोजना आदी विषयांवर या क्षेत्रातील तज्ज्ञ परिषदेत चर्चा करतील. त्यात सरकारचे संबंधित खात्यांचे मंत्री, तेल उत्पादन कंपन्यांचे अधिकारी आणि प्रतिनिधी, धोरणकर्ते, संशोधक आदींचा समावेश असेल. या परिषदेत हे सर्व जण एकाच व्यासपीठावर येऊन देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी रणनीती ठरवतील.
देश सध्या स्थिर सरकारच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मार्गावर आहे. त्यामुळे ऊर्जेची गरज सतत वाढत आहे. अशा वेळी पूर्वानुभवाचा आढावा घेऊन, सद्यस्थितीचे अवलोकन करून भविष्यातील संधींचा वेध घेणे क्रमप्राप्त आहे.
इंधन आणि ऊर्जेचा पुरवठा सुनिश्चित करणे हा सरकारच्या धोरणांचा आणि योजनांचा कणा आहे, असा ऊर्जा (खनिज तेल आणि नैसर्गिक वायू) राज्यमंत्री धर्मेद्र प्रधान यांचा विश्वास आहे. त्यानुसार देशाचे ऊर्जाविषयक भविष्य उज्ज्वल असल्याबद्दल जागतिक समूहाला आश्वस्त करणे आणि देशात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण बनवणे, असाही या परिषदेचा उद्देश आहे.
मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, संवाद आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद, धर्मेद्र प्रधान, प्रसिद्ध लेखक आणि प्रमुख वक्ते डॉ. डॅनियल येर्गिन यांच्यासह अनेक मान्यवर परिषदेला उपस्थित असतील.