प्रियंका गांधींचं निवडणुकीच्या रिंगणात आगमन झाल्याच्या घटनेचं वर्णन भारतीय जनता पार्टीनं राहूल गांधींच्या अपयशावर झालेलं शिक्कामोर्तब असं केलं आहे. प्रियंका गांधी यांची महासचिवपदी नियुक्ती केल्याची तसेच त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशमध्यमध्ये प्रचाराची जबाबदारी असेल अशी घोषणा आज काँग्रेसनं केली आहे. या नियुक्तीमुळे ठराविक मतदारसंघाबाहेर सक्रिय राजकारणात उतरताना पहिल्यांदाच प्रियंका बघायला मिळणार आहेत. राहुल गांधी देशभरात काँग्रेसचा प्रचार करत असताना लोकसभेच्या शंभरपेक्षा जास्त जागा असलेल्या हिंदी बेल्टमध्ये प्रियंका प्रचार करताना दिसू शकतील.

या घटनेवर प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना संबित पात्रा म्हणाले की काँग्रेसमध्ये सगळी पदं पहिल्या कुटुंबालाच मिळतात याचाच हा पुरावा आहे. “प्रियंकांवर ही जबाबदारी देणं हे राहुल यांच्या अपयशावर केलेलं शिक्कामोर्तब आहे. महाआघाडीला राज्या-राज्यामध्ये नकार मिळाला आहे. त्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज भासलेली आहे,” असं पात्रा म्हणाले.

भारतीय जनता पार्टी व काँग्रेसमध्ये फरक असल्याचे सांगताना पात्रा म्हणाले की भाजपा हे एक पक्षाचं कुटुंब आहे तर काँग्रेसमध्ये कुटुंबच पक्ष आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी असा आत्तापर्यंतचा प्रवास असून आता प्रियंका गांधींची नियुक्ती हा फर्स्ट फॅमिलीचा राज्याभिषेक असल्याची टीका पात्रा यांनी केली आहे.

आत्तापर्यंत निवडणुकीच्या राजकारणात न उतरलेल्या प्रियंका गांधी यांनी रायबरेली व अमेठी या दोन मतदारसंघात केलेला प्रचार वगळता राजकारणात फारसा रस दाखवला नाही. मात्र आता पूर्व उत्तर प्रदेशची धुरा खांद्यावर घेतलेल्या तसेच महासचिवपद स्वीकारलेल्या प्रियंका कदाचित निवडणुकीलाही उभ्या राहतील आणि उत्तर प्रदेशसह अन्य ठिताणी प्रचार करतील अशीही शक्यता आहे. इंदिरा गांधींशी असलेलं साम्य व आक्रमक भाषणशैली या प्रियंका यांच्या जमेच्या बाजू असून काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होण्याची शक्यता आहे.