राजस्थानातील राजकारण सगळ्यांचं लक्ष असलेल्या सचिन पायलट यांनी अखेर मौन सोडलं आहे. सचिन पायलट यांनी आपल्याला ३५ कोटींची ऑफर दिली होती, मात्र आपण ती नाकारली आणि मुख्यमंत्र्यांना याबद्दल माहिती दिली, असा आरोप काँग्रेसच्या एका आमदारानं केला होता. या ३५ कोटींच्या ऑफरच्या आरोपावर सचिन पायलट यांनी भूमिका मांडली. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी दुःखी आहे पण मला याचं कोणतंही आश्चर्य वाटत नाही,” असं पायलट यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस आमदारानं केलेल्या आरोपानंतर सचिन पायलट यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. “अशा आरोपांनी मी निराश झालो आहे, मात्र मला याचं आश्चर्य वाटत नाही. अशा पद्धतीनं मला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. खरंतर हे मूळ मुद्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीचे प्रयत्न आहेत. मी राजस्थानातील नेतृत्त्वाविरोधात ज्या बाबींवर बोललो. त्यानंतर या बाबी टाळण्यासाठी हे केलं जात आहे. ज्या आमदाराने माझ्यावर आरोप केले, त्या आमदाराविरोधात मी योग्य आणि कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे,” असं पायलट यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते गिरीराज सिंह?

“मी रेकॉर्डिंग केलेली नाही. रेकॉर्डिंग करण्याबद्दल माहिती नाही. ना मी कधी खोटे आरोप लावत नाही. भाजपावाल्यांनी माझ्यासोबत कधीही चर्चा केली नाही. विरोधी पक्षातील आहेत म्हणून खोटे आरोप लावणं हे चुकीचं आहे. माझी चर्चा सचिन पायलट यांच्याशी झाली होती. त्यांनी पैशाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले होते जितके हवे तितके पैसे घ्या असं म्हणाले होते. ३५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. ते उपमुख्यमंत्री असताना दोन तीन वेळा माझी त्यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना यांची माहिती दिली होती. त्यावर ते मला म्हणाले होते की सगळं काही ठिक होईल,” अशी माहिती आमदार गिरीराज सिंह यांनी दिली होती.