सिंगापूर येथील फिनटेक फेस्ट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा युवकांची क्षमता व त्यांच्या ऊर्जेवर विश्वास दर्शवला आहे. आज तंत्रज्ञानाच्या ताकदीची व्याख्या बदलत असून यात युवकांचा मोठा वाटा आहे. युवकांची क्षमता आणि त्यांच्या ऊर्जेवर विश्वास दाखवला पाहिजे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले. त्याचदरम्यान त्यांनी फिनटेक कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी निमंत्रणही दिले.

यावेळी त्यांनी जनधन योजनेचाही उल्लेख करत सरकारने आर्थिक समावेशनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले, माझे सरकार २०१४ मध्ये सर्वसमावेशक विकासाचे लक्ष्य ठेवत सत्तेवर आले. सरकारने दुर्गम भागातील सामान्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक बदल घडवले आहेत. भारतात हे सोपे नव्हते. यासाठी आर्थिक समावेशनाच्या ठोस आधाराची गरज होती. आज सुमारे १.३ अब्ज भारतीयांसाठी आर्थिक समावेशनाचे हे एक सत्य आहे. आम्ही केवळ काही वर्षांत १.२ अब्जाहून अधिक बायोमॅट्रिक ओळख- आधार बनवले आहेत.

फिनटेक कंपन्या आणि स्टार्टअप्सला भारतात गुंतवणुकीसाठी निमंत्रित करताना मोदी म्हणाले की, गुंतवणुकीसाठी भारत एक चांगले ठिकाण आहे. भारतात फिनटेक इनोव्हेशन आणि इंटरप्रायजचा वेगाने विकास होत आहे. त्यामुळे जगात फिनटेक आणि स्टार्टअपच्या दृष्टीने भारत अग्रणी देश झाला आहे. भारतात त्यांना चांगले भवितव्य आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेन्स यांची बुधवारी येथे भेट होणार आहे. यावेळी दोघांमध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य आणि स्वतंत्र व खुल्या हिंदी महासागरात प्रवेशाबाबत धोरणे आखण्यावर चर्चा होऊ शकते.

व्हाइट हाऊसकडून मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता भेट होईल. पेन्स या दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावतीने हजर राहणार आहेत. आशियान परिषदेत मोदी आपल्या अॅक्ट इस्ट पॉलिसीवरही चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून कळते.