लष्करी जवानांना घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीतून स्मोक बॉम्ब ठेवलेले खोके चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशात घडली.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाची पाळत असलेल्या झाशीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लिपिकावर आयएसआयशी संबंधित लोकांसह पाकिस्तानातील हेरांना माहिती पुरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अनेक आठवडय़ांनी ही संवेदनशील घटना उघडकीस आली.

महाराष्ट्रातील पुलगावहून पंजाबमधील पठाणकोटकडे निघालेली ही विशेष गाडी रविवारी झाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेर थांबली असताना, एका डब्याचे सील तुटले असून त्यातील स्मोक बॉम्ब ठेवलेले एक खोके गायब असल्याचे लष्कराच्या जवानांना आढळले.

या प्रकरणी शासकीय रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) तक्रार नोंदवण्यात आली असून तपास सुरू आहे, असे मंडळ अधिकारी शरदप्रताप सिंह यांनी सांगितले. मध्यप्रदेशातील बिना ते झाशी रेल्वे स्थानकादरम्यानचे अंतर पार करताना ही गाडी बऱ्याच ठिकाणी थांबल्यामुळे याच भागात ही घटना घडली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

या महिन्याच्या सुरुवातीला, बबिना कँटॉनमेंटमधील लष्कराच्या हालचालींविषयी स्वत:ची ओळख ‘मेजर यादव’ असे सांगणाऱ्या एका ‘गूढ’ व्यक्तीला गोपनीय माहिती पुरवल्याबद्दल झाशी जिल्हाधिकारी कार्यालयात लघुलिपिक म्हणून काम करणाऱ्या राघवेंद्र अहिरवार याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाकिस्तानातील संशयित हेरांना माहिती पुरवल्याच्या संशयावरून अहिरवार याच्यावर उत्तर प्रदेश एटीएसची पाळत होती. ‘मेजर यादव’ हा अहिरवारला इंटरनेट कॉल्स करून ही माहिती मिळवत असल्याचे पोलिसांना तपासात आढळले. अहिरवार मात्र यादवला उलट फोन करू शकत नव्हता. हा हेर २००९ सालापासून अहिरवारच्या संपर्कात होता.