उत्तर प्रदेशमध्ये एका मुलाने त्याच्या पित्याच्या मारेकऱ्याची तुकडे करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी १२ वर्षे लागली म्हणून मारेकऱ्याचे शरीराचे १२ तुकडे केल्याची कबुलीही मुलाने पोलिसांसमोर दिली. २००३ मध्ये आझम खान हा १२ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा खून होताना त्याने पाहिले होते. आझमचा नातेवाईक असणाऱ्या मोहम्मद रईस याने त्याच्या वडिलांना मारले होते. ही घटना लक्षात ठेऊन आझम गेली अनेक वर्षे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची योजना आखत होता. अखेर गेल्या आठवड्यात त्याला संधी मिळाली. त्याने गेल्या आठवड्यात मोहम्मद रईसला घरी मद्यपानासाठी बोलावले. मोहम्मदला दारूची नशा आल्यानंतर आझमने त्याला चाकूने भोसकून ठार मारले. त्यानंतर हातोडी आणि करवतीच्या साह्याने मोहम्मदच्या शरीराचे तुकडे केल्याची कबुली आझमने अटक झाल्यानंतर दिली. हत्या केल्यानंतर आझम आणि त्याच्या साथीदाराने मोहम्मदच्या शरीराचे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले आणि नदीत फेकून दिले. या पिशव्या जेव्हा नदीच्या किनाऱ्याला लागल्या तेव्हा ही हत्या झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी ओळख पटवल्यानंतर हा मृतदेह मोहम्मदचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला असता हत्येच्या अगोदर मोहम्मद आझमच्या घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी आझमला ताब्यात घेतले आणि या संपूर्ण हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. मोहम्मदच्या शरीराचे तुकडे करताना मी गाणी लावली होती, असे आझमने सांगितले. आझमने कोणलाही त्याच्या वडिलांच्या मारेकऱ्याबद्दल सांगितले नव्हते, त्याऐवजी त्याने वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी १२ वर्षे वाट पाहिली, असे आझमने पोलिसांना सांगितले.