राहुल आणि सोनिया गांधी हे कमिशन एजंट असल्याची टीका भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. तसेच त्यांच्याकडे एकूण अडीच लाख कोटींची संपत्ती असल्याचा दावाही केला आहे.

अहमदाबाद येथील पत्रकार परिषदेत सुब्रमण्यम यांनी गांधी परिवारावर घणाघात केला. सोनिया आणि राहुल गांधी यांना पाणबुडीचे पार्ट निर्यात करणाऱया एका फ्रेंच कंपनीसोबतच अन्य काही कंपन्यांकडून दलाली मिळते, असा खळबळजनक आरोप सुब्रमण्यम यांनी केला आहे. मात्र, त्यांनी त्या कंपन्यांची नावे किंवा पुरावे दिले नाहीत.

याआधी स्वामी यांनी राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा आरोप करीत कागदपत्रे सादर केली होती. मात्र ती टायपिंगमधील चूक असल्याचा खुलासा ब्रिटन सरकारच्या संबंधित विभागाकडून करण्यात आला. आता राहुल आणि सोनिया यांना कमिशन एजंटची उपमा देऊन स्वामी यांनी नवा वाद निर्माण केला आहे. राहुल गांधी हे नेते नसून कमिशन एजंट आहेत. इतकेच नाही तर सर्वच काँग्रेस नेते एजंटगिरीचेच काम करत असल्याचे स्वामी म्हणाले.

केवळ कमिशन मिळवण्यासाठी राहुल यांनी अनेक कंपन्या सुरू केल्या असून त्यांच्याकडे तुर्कीचे नागरिकत्व आहे की नाही याचा मी तपास करेन, असेही स्वामी यांनी सांगितले आहे.