मधुमेहविरोधी औषध पायोग्लिटॅझोनवर बंदी घालण्याच्या निर्णयास उद्योगसमूह आणि वैद्यकीय क्षेत्रातून जोरदार विरोध करण्यात आल्याने आरोग्य मंत्रालयाचे औषध तंत्रज्ञान सल्लागार मंडळ शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत या निर्णयाचा फेरविचार करणार आहे. फार्मास्युटिकल कंपन्या आणि वैद्यकीय क्षेत्रातून या निर्णयाविरोधात जोरदार आवाज उठविण्यात आला. सरकारचा हा निर्णय घिसाडघाईचा असल्याची ओरड झाल्याने आता या औषधावर घालण्यात आलेली बंदी उठविण्याच्या निर्णयाप्रत आल्याचे सूत्रांनी सांगितले.
तथापि, पायोग्लिटॅझोनचे विपरीत परिणाम होतात हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा अभ्यासातून सापडलेला नाही, असा दावा देशभरातील डॉक्टरांनी केला आहे. त्याचप्रमाणे पायोग्लिटॅझोनला पर्याय म्हणून देण्यात येणारी औषधे खूप महाग असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सदर औषध हे स्वस्त असल्याने त्याचा वापर करणाऱ्या रुग्णांचा विचार करून बंदीच्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल, असे औषध नियंत्रकांनी म्हटले आहे. तथापि, फेरविचार करताना रुग्णाची सुरक्षितता अबाधित राहील याची काळजी घेतली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.