तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपल्या गावातील २००० कुटुंबांना प्रत्येकी १०-१० लाख रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या मार्फेत ही रक्कम या कुटुंबांना दिली जाईल असं चंद्रशेखर राव यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ही घोषणा फक्त मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या गावापुरती करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे मूळचे चिंतामडाका गावातील आहेत. आपण गावातील लोकांचे ऋणी असून, त्यांचे आभारी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर राव यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, “राज्य सरकार चिंतामडका गावात राहणाऱ्या २००० कुटुंबांना १० लाख रुपये देणार आहे”. पुढे ते म्हणालेत की, “माझा जन्म सिद्दीपेठ जिल्ह्यातील या गावात झाला आहे. मी चिंतामडाका गावातील लोकांचा ऋणी आहे. मी तात्काळ ही रक्कम मंजूर करणार आहे”.

दरम्यान चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर २०० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. चंद्रशेखर राव यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून ट्रोल केलं आहे. जर तुम्हाला आपल्या गावातील लोकांचे उपकार फेडायचे असतील तर आपले पैसे खर्च का करत नाही ? असा प्रश्न एकाने विचारला आहे.

चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या गावातील लोकांचा फायदा होणार असला तरी लोकांनी हा आमचा पैसा असल्याने वैयक्तिक कारणासाठी खर्च केला जाऊ नये असं मत व्यक्त केलं आहे. हा करदात्यांचा पैसा असून तो अशा पद्दतीने खर्च करण्याचा त्यांना अधिकार नाही असंही अनेकांनी म्हटलं आहे.