सीरियावरील मित्रराष्ट्रांचा क्षेपणास्त्र हल्ला

सीरियात अमेरिका व मित्र देशांनी केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध करण्याचा रशियाचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळातील प्रयत्न फसला आहे. अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी हा हल्ला केला होता. त्यावर रशियाने तातडीने सुरक्षा मंडळाची बैठक घेण्यास भाग पाडले. त्यात जे मतदान झाले त्यात निषेधाचा ठराव फसला.

रशियाने अमेरिकी आक्रमणाचा निषेध करून ते ताबडतोब थांबवण्याची मागणी करणारा ठराव मांडला होता. त्यात रशियाला चीन व बोलिव्हिया यांचा पाठिंबा मिळाला. रशियाच्या ठरावाविरोधात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड्स, स्वीडन, कुवेत, पोलंड, आयव्हरी कोस्ट या देशांनी मतदान केले, तर इथिओपिया, कझाकस्तान, इक्विटोरियल गिनिया व पेरू हे देश अलिप्त राहिले. सीरियाच्या रासायनिक अस्त्रांवर ही आठवडय़ातील पाचवी बैठक होती. ७ एप्रिलला सीरियात दमास्कसचे उपनगर असलेल्या डौमा येथे करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्यात चाळीस जण मरण पावले होते, त्याविरोधात अमेरिकेने शनिवारी सीरियात हल्ले केले. आमच्याकडे बशर अल असाद राजवटीविरोधात पुरावे आहेत, असे अमेरिकेचे म्हणणे आहे, तर रशिया व सीरिया यांनी रासायनिक हल्ला असल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅले यांनी सांगितले, की असाद यांनीच रासायनिक हल्ला केला होता याची स्पष्ट माहिती उपलब्ध असून ते दोषीच आहेत. जर सीरियाने असा रासायनिक हल्ला केला असला, तर अमेरिकाही हल्ले करील, असे अध्यक्ष ट्रम्प यांनी सूचित केले होते.

रशियाचे राजदूत नेबेझिया यांनी सांगितले, की लंडन, पॅरिस व वॉशिंग्टन येथे शोधल्या गेलेल्या मिथकांवर आंतरराष्ट्रीय राजकारण व राजनय चालू आहे, हे यातून सिद्ध होत आहे. ब्रिटनचे राजदूत कॅरेन पियर्स यांनी सांगितले, की सीरियातील रासायनिक अस्त्रांबाबतच्या ठरावावर रशियाने नेहमीच नकाराधिकार वापरला आहे.

चौकशीसाठी नवा प्रस्ताव

अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन या देशांनी सीरियातील रासायनिक अस्त्रांच्या चौकशीसाठी नव्याने प्रस्ताव मांडला असून तो संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळ बैठकीत प्रसारित करण्यात आला. अमेरिकेने खरेतर आधी ठरल्याप्रमाणे चौकशी सुरू होण्याची वाट न पाहताच सीरियात हल्ला केला होता. हल्ल्यानंतर पुन्हा राजनयाच्या पातळीवर उतरताना पाश्चिमात्य देशांनी नव्याने चौकशीचा प्रस्ताव मांडला आहे. रासायनिक हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.

ग्रीसमध्ये निदर्शने

अथेन्स- ग्रीसमध्ये हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून अमेरिकेने सीरियावर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. कम्युनिस्ट पक्षाने या मोर्चाचे आयोजन केले होते. अथेन्समधील सेंट्रल सांत्यागमा चौकात जमलेले लोक नंतर अमेरिकी दूतावासापर्यंत मोर्चाने गेले, त्यात अमेरिकाविरोधी घोषणा देण्यात आल्या.

तपास सुरू

दमास्कस- सीरियातील हल्ल्यानंतर आता ओपीसीडब्ल्यू या रासायनिक अस्त्र देखरेख गटाच्या अधिकाऱ्यांनी रविवारपासून रासायनिक अस्त्र साठय़ाबाबत चौकशी सुरू केली आहे. ७ एप्रिलला सीरियातील डौमा येथे झालेल्या हल्ल्यात ४० जण ठार झाले होते, त्यात क्लोरिन किंवा सरिन वायू वापरण्यात आल्याची शंका आहे.

सीरियात मानवतावादी संकट

पॅरिस – सीरियातील इडलीब प्रांतात अडकलेल्या नागरिकांमुळे तेथे गंभीर मानवतावादी संकट उभे राहिले असल्याचे मत फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जाँ यीव्ज ल ड्रायन यांनी मांडले आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या सीरियातील क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले. इडलीब प्रांतावर अद्याप  बंडखोरांचे वर्चस्व आहे. तो भाग सरकारी नियंत्रणापासून दूर आहे. तेथे हजारो नागरिक अडकले असून त्याने गंभीर मानवतावादी संकट निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले.

इराणच्या अण्वस्त्राकांक्षेला आवरण्याची गरज – नेतन्याहू 

जेरुसलेम – अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने सीरियात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतन्याहू यांनी सीरियामधील इराणच्या हस्तक्षेपाबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच इराणसारख्या दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखले पाहिजे, असेही नेतन्याहू म्हणाले.

सीरियात स्फोटांचे आवाज

बैरूत- सीरियात इराणी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकू आले, असे सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्य़ूमन राइट्स या संस्थेने सांगितले. दक्षिण अलेप्पो भागात स्फोटाचे आवाज झाल्याचे वृत्त आहे. या भागात सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या राजवटीस पाठिंबा देणाऱ्या इराणी सैनिकांचा समावेश आहे. अमेरिकेच्या पेंटॅगॉनने मात्र आणखी हल्ले करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे म्हटले असून इस्रायलने कालच्या अमेरिकी हल्ल्यांना पाठिंबा दिला आहे.