एच १ बी व्हिसाचे प्रमाण पंधरा हजारांनी कमी करण्याचे विधेयक अमेरिकेच्या दोन सिनेटर्सनी मांडले आहे. हे विधेयक संमत झाल्यास भारतालाही फटका बसू शकतो. डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर बिल नेल्सन व रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जेफ सेशन्स यांनी हे विधेयक मांडले आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या एच १ बी व्हिसात कपात करण्याची मागणी करणारे विधेयक त्यांनी मांडले आहे.

पात्र अमेरिकी कर्मचारी उपलब्ध असताना अनेकदा बाहेरच्या देशातून कर्मचारी आणले जातात व त्यांच्याकडून कमी वेतनात काम करून घेतले जाते. सध्या कमाल ८५,००० एच १ बी व्हिसा दिले जातात त्यात वीस हजार व्हिसा विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणिताचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना दिले जातात.
भारतातून येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात व्हिसा दिला जातो. विधेयकात असे म्हटले आहे की, एच १बी व्हिसाचे प्रमाण १५ हजारांनी कमी करावे, त्याचबरोबर ७० हजार व्हिसा वाटप करताना जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना तो द्यावा. त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना प्रथम हे सिद्ध करावे लागेल की, त्यांनी आधी अमेरिकी कर्मचाऱ्यांना संधी दिली होती.
अमेरिकी कर्मचाऱ्याला काढून एच १ बी व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्याला घेता येणार नाही.