डाव्यांचा ‘लाल किल्ला’ असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. २५ वर्षांनी या राज्यात सत्ताबदल होतो आहे. अशात आता चर्चा रंगली आहे ती मुख्यमंत्रीपदाची. मुख्यमंत्रीपदाचे सर्वात प्रबळ दावेदार म्हणून बिप्लब कुमार देब यांचे नाव चर्चेत आहे. ६० सदस्य असलेल्या त्रिपुरा विधानसभेत २०१३ मध्ये भाजपाची एकही जागा नव्हती. मात्र भाजपा स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करणार आहे. ही निवडणूक डावे आणि भाजपा अशीच होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या अनेक नेत्यांनी मेहनत केली. कोणताही चेहेरा समोर न ठेवता भाजपाने ही निवडणूक लढली. त्याचमुळे आता या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होईल? ही चर्चा रंगली आहे.

त्रिपुरा येथील बनमालीपूर या ठिकाणाहून बिप्लब कुमार देब यांन निवडणूक लढवली. भाजपाचे प्रवक्ते राम माधव शनिवारी जेव्हा निवडणूक निकालांवर बोलण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यासोबत बिप्लब कुमार देव होतेच. बिप्लब कुमार देब यांचा स्वभाव शांत आहे. राजकारणातील स्वच्छ प्रतिमा असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हेगारी खटला नाही. आरएसएसचे नेते एन गोविंदाचार्य यांना ते आपले आदर्श मानतात. नेतृत्त्वगुण, राजकारणातील समज याचे धडे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळाले आहेत.

१५ वर्षांपूर्वी बिप्लब कुमार देब दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी आले होते.जिममध्ये जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होती. २०१६ मध्ये त्यांना पक्षाने त्रिपुरात पाठवले. त्यानंतर त्यांनी त्रिुपुरात भाजपाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे पहिले दावेदार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे माहिती भाजपाच्या एका नेत्याने दिली आहे.