२०१५-१६ या वर्षांत देशात ६२ हजारांहून अधिक महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडल्याची माहिती सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली.
भारतात महिलांना होणाऱ्या शरीरशास्त्रीय कर्करोगांच्या प्रकारांपैकी गर्भाशयाच्या कर्करोगाला बळी पडणाऱ्या महिलांची संख्या २४ टक्के आहे. भारतीय महिलांना होणाऱ्या कर्करोगाचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. २०१५-१६ या वर्षांत देशात गर्भाशयाच्या कर्करोगामुळे अंदाजे ६२,४१६ महिलांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जयप्रकाश नड्डा यांनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमात (एनसीडीआयआर) गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे सांगितले. कर्करोगाचा प्रतिबंध, निदान व उपचार याकरिता राज्य सरकारे करत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकार मदत करते, असेही नड्डा म्हणाले.