स्वच्छ गंगा नदीसाठी आमरण उपोषण करणारे कार्यकर्ता संत गोपाल दास बेपत्ता झाले आहेत. 24 जूनपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. देहरादून येथील रुग्णालयातून संत गोपाल दास बेपत्ता झाले असून पोलीस अद्याप त्यांचा शोध लावू शकलेले नाहीत. देहरादून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल दास यांना मंगळवारी दिल्लीमधील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना देहरादून येथील दून रुग्णालयात दाखल केलं होतं.

रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक के के टामटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘4 तारखेला मध्यरात्री एका व्यक्तीने दास यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्या व्यक्तीने आपण दास यांचे सहकारी असल्याचं सांगितलं होतं. बुधवारी संध्याकाळी मी रुग्णालयातून निघालो होतो. रात्री 8.30 वाजता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दास बेपत्ता असल्याची माहिती मला दिली’.

डीसीपी विजय कुमार यांनी आम्हाला दास यांच्या वडिलांकडून तक्रार मिळाली असून तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दास काहीच अन्न घेत नव्हते. त्यांनी अॅलोपॅथिक उपचारालाही नकार दिला होता.

देहरादूनचे एसपी प्रदीप राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली नव्हती. आम्ही संबंधित पोलीस ठाण्याला बेपत्ता झाल्याची माहिती दिली आहे.

एकीकडे पोलीस आणि रुग्णालय दास यांच्या सहकाऱ्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचा दावा करत असताना दास यांचे मित्र आणि सहकारी मात्र एम्स रुग्णालयातील कोणतीरी त्यांना रुग्णालयात आणल्याचं म्हणत आहेत. एम्स रुग्णालयाने 4 डिसेंबरला दास यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती दिली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रवीण सिंह नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना एम्स रुग्णालय आणि दिल्ली पोलिसांनी दोन आठवड्यात घटनाक्रम सांगणारं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तसंच देहरादूनमधील रुग्णालयात दाखल करायचं होतं तर एम्स रुग्णालयाने डिस्चार्ज का दिला अशी विचारणाही करण्यात आली आहे.