पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीवदरम्यानची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि तेल अवीवदरम्यान दर आठवड्याला चार विमानसेवा चालवण्यात येतात, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.

“मध्य पूर्वेतील परिस्थिती लक्षात घेता तेल अवीवला जाणारी आणि तेथून येणारी आमची उड्डाणे ३० एप्रिलपर्यंत स्थगित राहतील. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. या काळात ज्यांनी तेल अवीवला जाण्याचे किंवा तेथून येण्याचे बुकिंग केले असेल त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत. या प्रवाशांना तिकिट रद्द करणे किंवा रिशेड्युल करण्याकरता एकवेळ शुल्कमाफी देण्यात येत आहे. एअर इंडियासाठी आमच्या ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असं एअर इंडियाने म्हटलं आहे.

इस्रायल-हमास युद्धादरम्यानही झाली होती सेवा खंडित

टाटा समूहाच्या एअर इंडियाने ७ ऑक्टोबर रोजी भारत ते तेल अवीव ही उड्डाण सेवा रद्द केली होती. इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, वातावरण निवळल्यानतंर ४ मार्च रोजी एअर इंडियाने ही सेवा पुन्हा सुरू केली.

हेही वाचा >> पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   

तेल अवीवसाठी अनेक विमानसेवा स्थगित

दिल्ली ते तेल अवीव या प्रवासासाठी एअर इंडिया आठवड्याला चार उड्डाणे चालवतात. परंतु, गेल्या काही दिवसांत परिस्थिती चिघळत असल्याने अनेक विमान वाहतूक कंपन्यांनी या मार्गादरम्यान सेवा खंडित केली होती. १५ एप्रिल रोजी जर्मन एअरलाइन ग्रुप लुफ्थान्साने इराणच्या क्षेपणास्त्र आणि इस्त्रायलवरील ड्रोन हल्ल्यानंतर अम्मान, बेरूत, एरबिल आणि तेल अवीवची उड्डाणे देखील स्थगित केली.

पश्चिम आशिया युद्धाच्या छायेत

इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर हल्ला केल्यानंतर आणि इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पश्चिम आशिया युद्धाच्या छायेत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इस्रायलने प्रमुख लष्करी हवाईतळ आणि आण्विक स्थळ असलेल्या इराणच्या मध्य इस्फान शहरावर शुक्रवारी ड्रोन हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायलच्या तीन ड्रोनना लक्ष्य केले. या ताज्या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील तणाव टोकाला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचे ढग जमू लागले आहेत.