अल्मॅटी विमानतळाकडे येत असताना स्कॅट एअरलाइन्सचे एक विमान गडद धुक्यामुळे कोसळून झालेल्या अपघातात २० जण ठार झाल्याचे सदर विमान कंपनीने स्पष्ट केले आहे.या विमानात अपघात झाला, त्यावेळी एकूण २० जण होते. यात १५ प्रवासी, तर पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता, असे विमान कंपनीचा हवाला देताना इंटरफॅक्स न्यूज एजन्सीने म्हटले आहे.
आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी यात मरण पावले आहेत. कॅनेडियन बनावटीचे सीआरजे-२०० जातीचे हे विमान होते. विमानतळापासून पाच कि.मी. अंतरावर हे विमान कोसळल्याचे स्कॅट एअरलाइन्सने म्हटले आहे. कझाकस्तानच्या गृह तसेच वाहतूक मंत्रालयातील अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
कझाकस्तानमध्ये गेल्या दोन महिन्यांत झालेली ही दुसरी विमान दुर्घटना आहे. डिसेंबर महिन्यात लष्कराचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत २७ जण मरण पावले होते.