नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीतील फिसकटलेली जागावाटपांची चर्चा पुन्हा रुळावर आली असून उत्तर प्रदेश, दिल्लीनंतर पश्चिम बंगालमध्येही काँग्रेस व तृणमूल काँग्रेल या दोन्ही घटक पक्षांमध्ये जागावाटपावर मतैक्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला तृणमूल काँग्रेसने फक्त दोन जागा देऊ केल्यामुळे ‘इंडिया’तील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व माकपची डावी आघाडी हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची चिन्हे दिसू लागली होती. मात्र, काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाशी जागावाटपावर सामंजस्य घडवून आणल्यानंतर पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला दोनपेक्षा जास्त जागा देण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेसने किमान ७-८ जागांची मागणी केली आहे.

आसाममध्ये १४ जागा तर, मेघालयमध्ये २ जागा असून काँग्रेसने ईशान्येकडील या दोन राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेससाठी प्रत्येक एक जागा दिली तर पश्चिम बंगालमध्येही जागावाटपाबाबत तृणमूल काँग्रेसकडून तडजोड केली जाण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने २२, भाजपने १८ तर काँग्रेसने फक्त २ जागा जिंकल्या होत्या. प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मध्यस्थी केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या जागावाटपाचा तिढा सुटला आहे. पश्चिम बंगालमधील जागावाटपाच्या वाटाघाटी मार्गी लावण्यासाठी सोनिया गांधींकडून ममता बॅनर्जीशी संवाद साधला जाऊ शकतो असे मानले जात आहे.

हेही वाचा >>>भाजपवर ‘देणगीवसुली’चा आरोप; काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

गुजरातमध्ये ‘भरुच’वरून वाद

काँग्रेस व आप यांच्यामध्ये दिल्लीप्रमाणे गुजरातमध्येही आघाडी होणार असली तरी भरुच लोकसभा मतदारसंघावर दोन्ही पक्षांनी दावा केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भरुच जिल्ह्याशी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे पारंपरिक नाते राहिले होते. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघावर पटेल कुटुंबाने दावा केला असून काँग्रेसने हा मतदारसंघ ‘आप’ला देऊ नये अन्यथा आघाडीच्या उमेदवाराला मदत केली जाणार नाही, असा इशारा पटेल यांचे पुत्र फैसल पटेल यांनी दिला आहे. पटेल यांची मुलगी मुमताज पटेल या मतदारसंघातून लढण्यास उत्सुक आहेत. मात्र ‘आप’ने याआधीच चैतर वसावा यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

राहुल गांधी-उद्धव ठाकरे चर्चा

महाराष्ट्रातही महाविकास आघाडीतील जागावाटपांच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागावाटपाबाबत गुरुवारी तासभर चर्चा झाल्याचे समजते. ४८ पैकी ४० जागांवर मतैक्य झाले असून उर्वरित आठ जागांवर लवकरच तोडगा काढला जाईल असे नेत्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधींनी ‘भारत जोडो न्याय’ यात्रेची अखेर मुंबईत होणार असून त्याआधी महाविकास आघाडीतील जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allotment of seats in india alliance begins amy
First published on: 24-02-2024 at 03:00 IST