भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासावर कोणत्याही उपाययोजना अथवा पूर्वतयारी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि अर्थ सचिव शक्तिकांता दास यांच्यावरही टीका केली. ते दोघेही नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करण्याऐवजी हातावर हात ठेवून बसले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा नोटाबंदीनंतर कोणतीही तयारी केली नसल्याचा आरोप करत अरुण जेटली, अरविंद सुब्रमण्यम आणि शक्तिकांता दास यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अर्थमंत्री जेटली यांनी कोणतीही तयारी केली नाही. सर्व काही अस्थिर आहे. मी अरविंद सुब्रमण्यम आणि शक्तिकांता दास यांना हटवण्याबाबत आवाज उठवला होता. पण त्यानंतर अरुण जेटली यांनी त्यांचे समर्थन केले. पण आता मला माहिती झाले आहे की, त्यांनी कोणतेही काम केले नाही. याची कुणीतरी जबाबदारी घ्यायला हवी, असेही स्वामी यानी म्हटले आहे. दरम्यान, स्वामी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारची स्तुती केली आहे. या निर्णयामुळे दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा थांबेल, असे त्यांनी म्हटले आहे.