इटानगर : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू व उपमुख्यमंत्री चौना मीन यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या दहा उमेदवारांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाली. अरुणाचलमध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा शनिवारी शेवटचा दिवस होता.

पेमा खांडू हे तवांग जिल्ह्यातील मुक्तो मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. तर चौन मीना हे चौखम येथून निवडून आले. येथील काँग्रेस उमेदवाराने माघार घेतली. सहा मतदारसंघात एकच उमेदवार होते तर चार ठिकाणी उर्वरित उमेदवारांनी शनिवारी माघार घेतल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पवनकुमार सेन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> आंध्र प्रदेशात जगनमोहन यांना शह देण्यासाठी चंद्राबाबूंची मोर्चेबांधणी

खांडू  हे चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. मुक्तो मतदारसंघातून २०१० मध्ये पोटनिवडणुकीत ते बिनविरोध आले होते. २०१४ व १९ मध्ये येथून मोठया मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला होता.

विधानसभेबरोबरच अरुणाचल प्रदेशातील पूर्व व पश्चिम अरूणाचल या दोन लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होईल. त्यासाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. यापूर्वी २०१९ मध्येही भाजपचे तीन उमेदवार विधानसभेवर बिनविरोध आले होते.

माजी राजदूत संधू यांना उमेदवारी

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी ११ उमेदवारांची शनिवारी घोषणा करण्यात आली. त्यात ओडिशातील कटक येथून बी.महताब, लुधियाना येथून रवनीतसिंग बिट्टू, पतियाळातून परनीत कौर यांचा समावेश आहे. याखेरीज अमेरिकेतील माजी राजदूत तरणजितसिंग संधू यांना प्रतिष्ठेच्या अमृतसर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली.