आसाममध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी केलेला एन्काऊंटर बनावट असल्याचा दावा करणाऱ्या महानिरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. पूर्वोत्तर राज्यांमधील महानिरीक्षक रजनिश रॉय यांची तात्काळ बदली करण्यात आली असून त्यांना चित्तूरमध्ये पाठवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्च २०१७ रोजी आसाममधील चिरंगमध्ये लष्कर, आसाम पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सशस्त्र सीमा दलाने संयुक्तपणे एन्काऊंटर केले होते. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला होती. या चकमकीची महानिरीक्षक रजनिश रॉय यांनी चौकशी केली होती. जीपीएसचा अहवाल आणि चकमकीमध्ये समावेश असलेल्या मंडळींची प्रत्यक्ष चौकशी केल्यानंतर ही चकमक बनावट असल्याचा रिपोर्ट रॉय यांनी सीआरपीएफच्या मुख्यालयाला सादर केला होता.

रजनिश रॉय यांची शिलाँगमध्ये पूर्वोत्तर राज्यांमधील सीआरपीएफचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. रॉय यांच्या या अहवालाने खळबळ माजली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने या बनावट चकमकीच्या चौकशीचे आदेश दिले होते. रॉय यांच्या अहवालानुसार एका गावातून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आणि यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होते. चकमक खरी वाटावी यासाठी त्यांच्या मृतदेहांवर शस्त्रास्त्र ठेवण्यात आली होती असे रॉय यांनी म्हटले होते.

इंडियन एक्सप्रेसने ज्या गावातून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते तिथे जाऊन पाहणी केली होती. रात्री दोन तरुण घरात झोपलेले असताना सुरक्षा दलांनी त्यांना घरातून पकडून बाहेर नेले असे ग्रामस्थांनी सांगितले होते. हा धक्कादायक प्रकार उघड करणाऱ्या रॉय यांच्या तडकाफडकी बदलीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या पद्धतीने रॉय यांची बदली झाली त्यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आयपीएस अधिकारी प्रकाश डी यांची नुकतीच सीआरपीएफमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सीआरपीएफच्या मुख्यालयाने गुवाहाटीमधील प्रशासनाला प्रकाश यांच्यासाठी गाडी आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यास सांगितले होते. प्रकाश डी गुवाहाटीमध्ये दाखल होताच रॉय यांच्या टेबलावर बदलीचे आदेश पोहोचले. १२ जून २०१७ रोजी हे आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे प्रकाश डी यांच्यासाठी पाठवलेले पत्रक आणि रॉय यांच्या बदलीचे आदेश हे दोन्ही एकाच दिवशी काढण्यात आले होते.

रॉय यांना आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथील सीआरपीएफच्या घुसखोर आणि दहशतविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून रुजू व्हावे असे आदेश देण्यात आले. बदलीचे आदेश तात्काळ लागू होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. रॉय यांनीदेखील बदलीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून याविषयी त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. सीआरपीएफचे महासंचालक आर आर भटनागर यांनीदेखील या वृत्तावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam fake encounter crpf ig rajnish rai who called for probe is shunted
Show comments