उत्तर प्रदेशात बदायूंमध्ये एका महिलेवर अत्यंत क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाने या गंभीर घटनेची दखल घेत आपल्या सदस्य चंद्रमुखी देवी यांना पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पाठवले.

“पीडित महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती, तर बलात्काराची घटना टळली असती” असे वक्तव्य चंद्रमुखी यांनी केले आहे. त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य आहेत.

“पीडित महिला कोणाच्या दबावाखाली असेल, तर तिने वेळ लक्षात घ्यायला हवी होती. उशिरा घराबाहेर जाणे टाळले पाहिजे होते. पीडित महिला संध्याकाळी एकटी घराबाहेर पडली नसती किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याबरोबर गेली असती, तर आज तिचे प्राण वाचले असते” असे चंद्रमुखी यांनी म्हटले आहे. चंद्रमुखी यांच्या वक्तव्यावर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या की, महिला त्यांच्या मर्जीने, त्यांना वाटेल तेव्हा, कधीही आणि कुठेही बाहेर फिरु शकतात.

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशात बदायूंमध्ये एका महिलेवर अत्यंत क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली. या घटनेने दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. बदायूंमधील या बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती, उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.

महिलेवर बलात्कार करण्यात आला. हादरवून सोडणारी बाब म्हणजे महिलेच्या गुप्तांगात जखमा आढळून आल्या असून, या अत्याचारात पीडित महिलेचा पायही मोडला. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाला असून, एका पुजाऱ्याने तिचा मृतदेह घरी आणल्याचं पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

३ जानेवारी रोजी महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, परत घरी आलीच नाही. महिलेच्या मुलाने दिलेल्या माहिती प्रमाणे, मंदिरातील पुजारी व इतर दोघांनी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणून ठेवला. त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच ते निघून गेले, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.