आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक कामे चुटकीसरशी हातावेगळी करता येतात. सर्व काही ऑनलाइन उपलब्ध असल्यामुळे आपली सगळी कामे सोपी झाली आहेत. मात्र, याच इंटरनेट, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची ऑनलाइन फसवणूकही केली जाते. यासाठी सायबर गुन्हेगारांकडून विविध पद्धतींचा वापर केला जातो. अशीच एक नवीन पद्धत आता पुढे आली आहे. बंगळुरूतील एका महिलेसोबत हा प्रकार घडला आहे.

बंगळुरूतील एका महिलेने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला आहे. तसेच नागरिकांनी सावध राहावे, असा सल्ला देखील तिने दिला आहे. ती म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मी ऑफीसमध्ये काम करत असताना मला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘आदिती बेटा, मला तुझ्या बाबांना पैसे पाठवायचे आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ते शक्य होत नाहीये. तुला पाठवले तर चालतील का?’ असे त्याने मला विचारले. तसेच त्याने माझा नंबर दाखवून खातरजमाही केली. त्यानंतर मी त्यांना हो म्हणून सांगितले.”

पुढे ती म्हणाली, “कॉल संपल्यानंतर काही मिनिटातच माझ्या खात्यात आधी १० हजार आणि नंतर ३० हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा कॉल करून सांगितले, की ‘मला तुझ्या वडीलांना ३ हजार पाठवायचे होते, मात्र मी चुकून ३० हजार पाठवले, बाकी पैसे परत करते का? मी दवाखान्यात उभा आहे, मला डॉक्टरला पैसे द्यायचे आहेत.’ एकूण हा प्रकार संशयास्पद असल्याचे लक्षात येताच मी माझ्या मोबाईलवर आलेले मेसेज बघितले तेव्हा ते मेसेज बॅंकेच्या नंबरवरून न येता, एका अनोळखी नंबरवरून आले होते. त्यानंतर मी त्या व्यक्तीला लगेच फोन केला, तेव्हा त्याचा फोन बंद होता”

हेही वाचा – बिर्याणीच्या बिलावरून तुफान राडा; पैसे मागताच ग्राहकांकडून रेस्टॉरंटच्या खुर्च्या, टेबलची तोडफोड, VIDEO व्हायरल

हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर या महिलेने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोणी तुमच्या खात्यात चुकून पैसे जमा झाल्याचे सांगितल्यास, आधी खातरजमा करा, असेही ती म्हणाली.